भाजपला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंना शरद पवार आणणार एकत्र ?

भाजपला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंना शरद पवार आणणार एकत्र ?

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी सरकार स्थापनेचं घोडं अडलेलंच आहे. एकीकडे अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाम आहे तर दुसरीकडे भाजपही मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती सोडायला तयार नाही. अशा राजकीय पेचात आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी नवी खेळी शरद पवार खेळत असल्याची जोरदार चर्चा सुरु झालीय.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंना एकत्र आणण्याचे प्रयत्न शरद पवार करत असल्याचं बोललं जातंय. गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहता या चर्चेला बळ मिळतंय. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राज्यातल्या ओल्या दुष्काळाच्या निमित्तानं एकमेकांशी फोनवरून चर्चा केली होती. त्या पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही शरद पवारांची त्यांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. 

यासोबतच, शिवसेनेचे सध्या प्रकाशझोतात असलेले नेते संजय राऊत यांनीही अलिकडच्या काळात दोन ते तीन वेळा शरद पवारांची प्रत्यक्ष भेट घेतलीय. तर दुसरीकडे राज ठाकरेंचे विश्वासू संदीप देशपांडे यांनीही नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती. या सगळ्या घडामोडी पाहता दोन्ही ठाकरेंना एकत्र आणणारा दुवा म्हणून शरद पवार सक्रीय झाले असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झालीय. 

भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला बळ देऊ शकतं. त्या दृष्टीने दोन्ही काँग्रेसमध्ये मतमतांतरं असली तरी या संदर्भातले सर्वाधिकार शरद पवारांकडे असतील, असं काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींनी या आधीच स्पष्ट केलंय. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधींची भेटही महत्त्वपूर्ण मानली जातेय.

तर दुसरीकडे सत्तास्थापनेच्या तिढ्यात सुवर्णमध्य म्हणून शरद पवारांनाच मुख्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं, अशीही चर्चा सुरु झालीय. असं झाल्यास आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात आणि शरद पवारांच्या तालमीत आदित्य यांची राजकीय वाटचाल सुरु होऊ शकते. या दृष्टीनेच राज ठाकरेंच्या मनसेलाही सोबत घेण्यासाठी शरद पवार उत्सुक असल्याचं बोललं जातंय.

शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास त्याचा फायदा दोन्ही काँग्रेसलाही होऊ शकतो आणि त्याचवेळी भाजपला रोखणंही शक्य होऊ शकतं. याचसाठी उद्धव आणि राज यांना एकत्र आणण्याच्या हालचाली पवारांनी सुरु केल्याची चर्चा आहे. 

WebTitle : sharad pawar may try to bring uddhav thackeray and raj thackeray together to keep bjp out of power

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com