ती आत्महत्या करण्यासाठी करत होती प्रवृत्त... वाचा काय आहे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

महिलेच्या वारंवार घाबरवण्यावरून अल्पवयीन मुलगी गोंधळून गेली

ठाणे  : "विनयभंग करणाऱ्या तरुणाची तक्रार केलीस, आता तो तुरुंगातून सुटल्यावर बदला घेईल,'' अशी भीती घालून अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेला तीन वर्षे सश्रम तुरुंगवास व 15 हजारांचा दंड अशी शिक्षा ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे.

हेही वाचा - पाण्याअभावी रखडली शस्त्रक्रिया

सुरेखा गायकवाड (40) असे आरोपी महिलेचे नाव असून न्यायमूर्ती आर. एस. गुप्ता यांनी बुधवारी (ता. 23) हा निर्णय दिला. तसेच दंडाच्या रकमेतील 10 हजार रुपये अल्पवयीन मुलीस देण्याचे न्यायमूर्तींनी निकालात नमूद केले आहे. 

कोपरी पोलिस ठाण्यात दाखल केलेले हे प्रकरण ठाणे जिल्हा न्यायालयात न्यायमूर्ती आर. एस. गुप्ता यांच्यासमोर अंतिम सुनावणीसाठी आले होते. या खटल्यात सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, कोपरीतील शांतिनगर येथे पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही राहतात. आरोपी महिलेचे या भागात किराणा दुकान आहे. याच परिसरातील संदेश दुर्वे याच्यावर पीडित मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 11 ऑगस्ट 2016 रोजी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्याअंतर्गतच त्याला तुरुंगात जावे लागले होते. दरम्यान, याच घटनेचा गैरफायदा घेऊन दुकानदार महिला सुरेखा गायकवाड हिने अल्पवयीन मुलीला दुर्वे सुटून आल्यानंतर बदला घेईल, अशी भीती घालून न्यायालयात दुर्वेबाबत काहीच सांगू नको अशी धमकी दिली.

महत्त्वाची बातमी - महाअधिवेशनाच्या दिवशीच मनसेला मोठा धक्का

महिलेच्या वारंवार घाबरवण्यावरून अल्पवयीन मुलगी गोंधळून गेली व 12 ऑक्‍टोबर 2016 रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता; मात्र काही वेळातच मुलीची आई घरी आली आणि तिने सर्व प्रकार थांबवत मुलीला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मुलीला शुद्ध येताच आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेवर बुधवारी (ता. 23) ठाणे जिल्हा न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी साक्षीपुरावे आणि पीडितेची जबानी ग्राह्य धरत आरोपी सुरेखा गायकवाड हिला तीन वर्षे सश्रम तुरुंगवास आणि 15 हजार दंड अशी शिक्षा ठोठावली. 

web title : She motivated her to commit suicide.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She motivated her to commit suicide.