ST News : महिलांना प्रवास सवलतीच्या निर्णय़ामुळे एसटीचा फायदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shinde fadanvis govt ST benefit from travel concession for women

ST News : महिलांना प्रवास सवलतीच्या निर्णय़ामुळे एसटीचा फायदा

- नितिन बिनेकर

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात महिलांना आता एसटी प्रवासांत सरसकट ५० टक्के सूट मिळणार आहे. यासोबतच ईलेक्ट्रीक बसेस खरेदी आणि शंभरपेक्षा जास्त बसस्थानकांची पुनर्बांधणी करण्याची घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

महिलांसाठीच्या या घोषणेचे स्वागत सर्व थरातून होत आहे. यामुळे एसटीची प्रवाशी संख्या वाढण्यास मदत होईल, मात्र सवतलीचा परतावा देण्याचा वाईट अनूभव बघता, यावेळी सरकारने एसटीला वेळेवर परतावा द्यावा नाही तर एसटी अधिक गाळात जायला वेळ लागणार नाही. असा इशारा एसटी अधिकारी, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्याच अर्थसंकल्पात एसटीच्या तिकीटदरात महिलांसाठी ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुले महिलांना आता निम्म्या दरात एसटी प्रवास करता येईल. विशेषता ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना लाभदायी ठरणार आहे. प्रवासी संख्या आणि महसूलात देखील या निर्णयामुळे वाढ होण्याची शक्यता आहे.

आधीच कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचा आर्थिक डोलारा कोसळला आहे. प्रवासी संख्य़ा घटली, उत्पन्नही घटले. कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होत नाही. त्यामुळे महिलांना प्रवास सवलतीचा निर्णय चांगला आहे. मात्र सरकारने या योजनेच्या पैशांचा परतावा एसटी महामंडळास वेळेत द्यावा अशी मागणी कर्मचारी,अधिकाऱ्यांची आहे.

लाभार्थ्यांची संख्या दुपट्ट होणार

महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २९ विविध सामाजिक घटकांना ३३ टक्के पासून १०० टक्के पर्यंत प्रवासी भाड्यात सवलत देते. आज घोषणा केलेली सवलत ३० वी आहे. या सवलतीच्या रक्कमेचा परतावा राज्य सरकारकडून केला जातो. वेगवेगळी सवलत मिळणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ३८ कोटीवर गेलेली आहे. या ताज्या निर्णयामुळे लाभार्थ्यांची संख्या दुपट्टीवर जाणार असल्याचा अंदाज एसटी महामडंळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र सवलतमुल्याची प्रतिपुर्ती वेळेवर व्हावी. तसेच एसटीच्या सवलतीच्या बाबतीत सर्व निर्णय सरकार घेत आहे त्याच पध्दतीने सरकारी कर्मचाऱ्याएवढं वेतनही देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा अशी अपेक्षा आहे.

संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र एस टी कामगार संघटना

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास योजना तसेच आता महिलांना ५० टक्के प्रवास दरात सवलत ह्या योजना सरकारने आणल्या त्या स्वागतार्ह आहेत. या योजनांचा पैशांचा परतावा वेळेवर द्यावा, त्यासोबत प्रवाशांना चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी नव्या ५००० गाड्या खरेदी कराव्यात. जेणेकरुन प्रवास चांगला व्हावा.

मुकेश तिगोटे, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस

घोषणा चांगली आहे. मात्र सलवतीच्या परताव्यासाठी एसटी महामंडळाचा अधिकाऱ्यांना मंत्रालयात चकरा मारण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले.

- श्रीरंग बरगे , सरचिटणीस महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस..

मुलींना शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे शासनाचे धोरण आहे. हे धोरण फार कौतुकास्पद आहे. या धोरणामुळे एसटी मंडळाला पुरेस अनूदान मिळेल. मात्र या निर्णयामुळे एसटी महामंडळ गाळ्यात जाणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी,

समिता पाटील, महिला प्रवासी

टॅग्स :Mumbai NewsST