रेवदंडा-चौल परिसरातील शितळादेवीचे मंदिर; एक आदिशक्तीचे स्थान

महेंद्र दुसार
Sunday, 18 October 2020

हिरव्या गर्द नारळी-पोफळीच्या छायेत चौलच्या खाडीकिनारी हे मंदिर होते. आता भराव झाल्याने खाडीचा किनारा दूर गेला आहे. या देवस्थानाबाबत अनेक आख्यायिका आहेत.

अलिबाग : पौराणिक काळापासून चंपावती आणि रेवती या नावाने प्रसिद्ध असलेल्या सद्याच्या रेवदंडा-चौल परिसरात 360 हुन अधिक मंदिरे होती. यातीलच शितळादेवीचे मंदिर आदिशक्तीचे स्थान म्हणून ओळखले जाते. हिरव्या गर्द नारळी-पोफळीच्या छायेत चौलच्या खाडीकिनारी हे मंदिर होते. आता भराव झाल्याने खाडीचा किनारा दूर गेला आहे. या देवस्थानाबाबत अनेक आख्यायिका आहेत. या देवीने समुद्राला शरण आणले अशीही एक कथा सांगितली जाते. नवरात्रौत्सवात या ठिकाणी अष्टागरातील महिला वेणी, नारळ आणि चोळीच्या खणाने देवीची ओटी भरतात. 

मीरा भाईंदरच्या पाणी प्रश्नावर मंत्रालयात बैठक, पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिक संतप्त

रायगड जिल्ह्यात देवीची जी पुरातन मंदिरे आहेत, त्यातीलच अलिबाग तालुक्‍यातील चौलचे शितळादेवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरात पारंपारिक पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार इ.स. 158 मध्ये बाबुभट उपाध्ये यांनी द्रव्य मिळवून केल्याची नोंद आहे. 1757 मध्ये विसावा सरसुभेदार यांनी ब्राह्मण भोजन घातले. 1785 मध्ये एप्रिलच्या सुमारास राघोजी आंग्रे आपल्या कुटुंबासह देवीच्या दर्शनास आले होते. त्यानंतर 1792 च्या ऑक्‍टोबरमध्ये ते मुलाबदद्‌लचा नवस फेडण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या कुटुंबासोबत हत्ती, घोडे आदी सरंजाम व काही लष्कर बरेच दिवस येथे तळ ठोकूण होते, अशी नोंद आहे. तसेच दसऱ्याच्या दिवशी दरवर्षी आंग्रे कुटुंब देवीच्या दर्शनाला न चुकता येत असत. अद्यापही प्रथा सुरु आहे.

नवरात्र उपवासात आहाराचा समतोल सांभाळा, प्रतिकार शक्ती टिकवण्याचा आहारतज्ञांचा सल्ला

पुर्वीचे आंग्रेकालीन लाकडी कौलारु देवालय पाडून त्याच वास्तूत मूर्तीची जागा न बदलता भव्य सिमेंटकॉंक्रीटचे मंदीर बांधण्यात आले आहे. यासाठी देविच्या भक्तांनी जीर्णोद्धार समिती स्थापन केली व त्याच जागी 27 मार्च 1990 रोजी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर नवीन मंदिर बांधण्यास सुरुवात केली. मार्च 1997 मध्ये हे काम पुर्ण झाले व भक्तांसाठी खुले करण्यात आले. सद्या कोरोनामुळे मुख्य गाभाऱ्यापर्यंत जाता येत नाही. तरीही देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.  

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shitladevi temple in Revdanda Chaul area A place of Adishakti