चर्चा तर होणारच ! लॉकडाऊन दरम्यान शिवसेना नगरसेवकांची गावी ये-जा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

कोरोनामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीच्या काळात नेरूळ-जूईनगरमधील शिवसेनेच्या एका नगरसेवकाने चक्क पुण्यातील गावाकडे अनेकदा ये-जा केल्याची चर्चा रंगली आहे.

नवी मुंबई : कोरोनामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीच्या काळात नेरूळ-जूईनगरमधील शिवसेनेच्या एका नगरसेवकाने चक्क पुण्यातील गावाकडे अनेकदा ये-जा केल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे आपल्या प्रवासाची माहिती पोलीस यंत्रणांपासून लपवून ठेवण्यात या नगरसेवकाला यश आले आहे. परंतू प्रभागातून अनेकदा गायब असल्यामुळे आणि त्यापासून आपल्याला कोरोना होऊ नये म्हणून या प्रभागातील नागरीकांनीच पूढाकार घेऊन समाजमाध्यमांवर चर्चा करायला सुरूवात केल्याने या नगरसेवकाची फजिती झाली आहे. 

हे ही वाचा काय सांगता ! 'सिगारेट' ओढल्याने कोरोनाचा धोका कमी? वाचा कोणी केलाय हा दावा

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने सर्वत्र ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी लावणारे राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांनाच आवाहन करून घराबाहेर न पडण्याची विनंती केली आहे. मात्र ठाकरे यांच्या या आवाहानाला त्यांच्याच पक्षातील एका नगरसेवकाने झुगारल्याची चर्चा जूईनगरमध्ये रंगली आहे. संचारबंदी लागू झाल्यावर हा नगरसेवक आपल्या खाजगी वाहनाने त्याच्या कुटुंबाला गावी सोडून परत नवी मुंबईत आला. इतकेच नाही तर प्रभागात विरोधकांनी किटकनाशक फवारणी केल्यानंतर आपण देखील फवारणी करायला हवी या उदात्त हेतूसाठी या नगरसेवकाने पुन्हा आपला गाव गाठला. गावाहून शेतामधील किटकनाशक फवारणीचे हातपंप आणून आपल्या प्रभागात फवारणी केली. फवारणी झाल्यानंतर हा नगरसेवक पुन्हा काही दिवस प्रभागातून गायब झाला.

महत्वाची बातमी  : खासगी रुग्णालयांबाबत महापौरांची आयुक्तांकडे 'ही' मागणी

आणीबाणीच्या काळात प्रभागाचा जनसेवकच गायब झाल्यामुळे नगरसेवकाला दाखवण्यासाठी विरोधकांनी बक्षिसे जाहीर केली. तेव्हा हा नगरसेवक पुन्हा भाजीचा टेम्पो घेऊनच प्रभागात अवरला. या नगरसेवकाने प्रभागात ठिक-ठिकाणी जाऊन माफक दरात भाजीपाला विक्री केला. परंतू अधूनमधून गायब होऊन पुन्हा अवतरण्याची मायावी शक्ती या नगरसेवकाकडे असल्यामुळे त्याच्या गायब होण्याचे मजेशीर किस्से प्रभागात रंगले आहेत. हा नगरसेवक भाजीच्या टेम्पोतून गावाकडे जाऊन पुन्हा शहरात येत असल्याने त्याच्या या खुष्कीचा मार्गाचा भांडाफोड समाजमाध्यमांवर झाला आहे. 

नक्की वाचा :  कौतुकास्पद ! धकधकता वणवा विझवण्यासाठी दोन तरुणांचं धाडस, वाचा चित्तथरारक अनुभव

रहिवाशी सोसायट्यांमध्ये घबराहट
हा नगरसेवक गावी जाऊन पुन्हा शहरात परतल्या नंतर जूईनगर आणि नेरूळ भागातील रहीवाशी सोसायट्यांमध्ये भाजी विक्री, फवारणी असे उपक्रम राबवत आहे. परंतू प्रवास करून आल्यामुळे त्याला कोरोना झाला असल्यास आपल्यालाही बाधा होईल म्हणून काही सोसायट्यांतील राहीवाशांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. 

 

कोरोनासारख्या महामारीच्या काळात नागरीकांंना मदत करण्याचे काम शिवसेनेचे सर्व नगरसेवक करीत आहेत. परंतू काही लोक अशा संकटसमयी देखील घाणेरडे राजकारण करून हेतूपस्पररित्या शिवसेना आणि नगरसेवकांना बदनाम करण्याचे काम करीत आहेत. आमचे सर्व नगरसेवक शहरातच असून नागरीकांच्या कामी येत आहेत.
- विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख, नवी मुंबई, शिवसेना

Shiv Sena corporator come and go in the village during lockdown

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena corporator come and go in the village during lockdown