ईडीच्या चौकशीनंतर रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra-Waikar
ईडीच्या चौकशीनंतर रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

ईडीच्या चौकशीनंतर रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचा आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांची अंमलबजावणी संचालनालयानं अर्थात ईडीनं (ED) काल (मंगळवार) सात तास चौकशी केली. या चौकशीनंतर वायकर पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला तसेच ईडीला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचंही ते म्हणाले. हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरुवात होण्यापूर्वी विधानभवनाबाहेर (State Assembly) माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ईडीच्या चौकशीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. (Shiv Sena MLA Ravindra Waikar first reaction after ED inquiry)

वायकर म्हणाले, "माझी सात तास वैगरे काही चौकशी झालेली नाही. त्यांनी मला चौकशीसाठी बोलावलं होतं, ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसमोर जाताना मी रिलॅक्स होतो. ज्या पद्धतीनं त्यांनी प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांना मी उत्तर दिली. त्यांनी जे जे प्रश्न विचारले जे जे पेपर्स मागितले ते मी देऊन टाकले आहेत"

किरीट सोमय्यांच्या आरोपांवर केलं भाष्य

वायकर हे मुख्यमंत्र्याचे बिझनेस पार्टनर आहेत त्यामुळं वायकरांच्या चौकशीनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही वेळ येणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं. यावर बोलताना वायकर म्हणाले, "किरीट सोमय्या हा केवढा मोठा मनुष्य आहे, तो काय सांगेल कोणाला आदेश देईल काय सांगू शकत नाही. सोमय्यांनी काहीही सांगितल्यानंतर जर आम्हाला ईडीला बोलवायचं असेल तर बोलावतील. ईडीसोबत आमची कुठलीही लढाई नाही. त्यांनी जी प्रश्न विचारले त्याची उत्तरं देणं माझं कर्तव्य होतं ते मी केलं. पुन्हा ईडीनं नोटीस पाठवली तर पुन्हा त्याला सामोरं जाईन"

टॅग्स :Mumbai News