Lok Sabha Poll 2024 : राजेंद्र गावीतांच्या ऊमेदवारी वरून भाजप- सेनेत ताणाताणी

लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन महिना होत आला आहे. महाविकास आघाडी ने आपला ऊमेदवार जाहीर करून प्रचाराचा धुराळा ऊडवला आहे.
Lok Sabha Poll 2024
Lok Sabha Poll 2024 Sakal

मोखाडा : लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन महिना होत आला आहे. महाविकास आघाडी ने आपला ऊमेदवार जाहीर करून प्रचाराचा धुराळा ऊडवला आहे. उद्धव ठाकरे यांनी पालघर मध्ये येऊन प्रचार सभा घेत, मोदी सरकार विरोधात रणशिंग फुंकले आहे. दुसरी कडे महायुतीत पालघर ची जागा वाटप आणि ऊमेदवार निश्चित झालेला नाही.

शिवसेनेने ही जागा आपलीच असुन ऊमेदवार म्हणून राजेंद्र गावीतांचे नाव घोषित करून त्यांच्या ऊमेदवारी चा अट्टाहास धरला आहे. तर भाजपने, ही पारंपारिक जागा आपल्याला मिळावी म्हणून आग्रही मागणी करत राजेंद गावीतांच्या ऊमेदवारी ला कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. 

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच राज्यात, महायुती आणि महाविकास आघाडी ने जुळवाजुळव सुरू केली. मात्र, महिना भराचा कालावधी होत आला तरी आघाडी आणि युती चे सर्व जागा वाटप आणि ऊमेदवार निश्चित झालेले नाहीत. अनेक ठिकाणी जागा आणि ऊमेदवारी च्या वाटाघाटी आणि तिढा तडीस गेलेले नाहीत.

पालघर ची जागा महायुतीमध्ये याच तिढ्यात अडकली आहे. शिवसेनेकडून ही जागा आपलीच असुन ऊमेदवार म्हणून राजेंद्र गावीत यांना वारंवार घोषीत केले जात आहे. तर भाजप च्या स्थानिक पदाधिकार्यांकडुन, पालघर ची जागा अनेक वर्षापासून युतीधर्मात, पारंपारिक पद्धतीने भाजपचीच असल्याचा दावा केला जातो आहे. या परस्पर विरोधी दाव्याने महायुतीचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात पडले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी सर्वप्रथम ही जागा शिवसेनेची असुन येथे राजेंद्र गावीत हे ऊमेदवार असल्याचे घोषित केले आहे. त्यादृष्टीने राजेंद्र गावीत यांनी जिल्ह्यात प्रचाराला सुरूवात केली आहे.

त्यानंतर लगेचच भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी ही जागा भाजप ची असुन राजेंद्र गावीतांच्या ऊमेदवारी ला ऊघड विरोध करत माध्यमांकडे आपली बाजु मांडली आहे. त्यामुळे भाजप सेनेत या जागेवरून रस्सीखेच सुरू झाली. 

भाजप- सेनेतील हा वाद गेली महिनाभरापासुन खदखदत आहे. त्यावेळी भाजप नेते आणि पालघर चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी महायुती च्या पदाधिकार्यांचा मनोर येथे मेळावा घेऊन " नरेंद्र मोदी हेच ऊमेदवार" समजून सर्वानी कामाला लागा असे आदेश दिले होते.

मात्र, त्यानंतरही भाजप पदाधिकार्यांमध्ये पालघर च्या जागेचा आग्रह कायम राहीला आहे. दरम्यान च्या काळात राजेंद्र गावीत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे गावीत भाजप कडुन ऊमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीत ऊतरणार असल्याच्या चर्चाना जिल्ह्यात ऊधाण आले आहे.

तालुकाध्यक्ष आणि पदाधिकार्यांनी घेतली जिल्हाध्यक्षांची भेट

राजेंद्र गावीत यांना भाजप कडून ऊमेदवारी मिळणार असल्याच्या वावड्या उठल्याने, भाजप च्या जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकार्यांनी जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांची भेट घेत, राजेंद्र गावीत यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात कुठल्याही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलेले नाही.

तळागाळातील खरा मतदारांमध्ये गावीत यांच्या विषयी नाराजी आहे. तसेच त्यांनी जणाधार गमावला असल्याचा पाढा वाचला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप च्या  कोणत्याही निष्ठावान कार्यकर्त्यांला ऊमेदवारी देण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास सामुहिक राजेनामे देण्याची तयारी केली आहे. तसेच ही वास्तव स्थिती वरिष्ठांपर्यत पोहोचवण्याची मागणी भाजप पदाधिकार्यांनी जिल्हाध्यक्षांकडे केली आहे. 

युवासेनेने भाजप पदाधिकार्यांच्या जखमेवर मीठ चोळले

भाजप पदाधिकार्यांच्या बैठकीनंतर युवासेनेचा कार्यकर्ता मेळावा पालघर मध्ये झाला आहे. या मेळाव्यात युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी राजेंद्र गावीत हेच पालघर लोकसभेच्या जागेसाठी महायुतीचे ऊमेदवार असल्याचे जाहीर करून भाजप पदाधिकार्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

त्यामुळे भाजप- सेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये दुरावा वाढला असुन वातावरण अधिकच तापले आहे. पालघर लोकसभा महयुती मध्ये नक्की कोणत्या पक्षाकडे आहे आणि ऊमेदवार कोण आहे ?

  याची ऊकल होत नसल्याने भाजप चे पदाधिकारी संभ्रमात पडले आहेत. तर वरिष्ठांच्या दबावामुळे भाजप चा कुठलाही पदाधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नाही. मात्र, दबक्या आवाजात ते माध्यम प्रतिनिधींना " तोंड दाबुन भुक्क्यांचा मारा" अशी आमची अवस्था झाल्याचे सांगत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com