उल्हासनगर पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेनेकडे, भाजपला पुन्हा धोबीपछाड

Ulhasnagar Municiple corporation Standing Comitee Chairmen Vijay Patil
Ulhasnagar Municiple corporation Standing Comitee Chairmen Vijay Patil

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विजय पाटील १ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या उमेदवार जया मखिजा यांचा पराभव केला. भाजपमध्ये असलेल्या विजय पाटील यांना शिवसेनेने थेट उमेदवारी दिल्याने निवडणुकी आधीच भाजप बॅकफूटवर गेली होती. महापौर पद मिळवण्यासाठी कंबर कसणाऱ्या भाजपचा डाव शिवसेनेने ओमी कालानी यांच्या सोबतीने याआधी हाणून पाडला होता. आता स्थायी समिती निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती करून शिवसेनेने भाजपला शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महाविकास आघाडीकडे 7 आणि भाजपाकडे 9 ही विजयी आकडेवारी असल्यामुळे सुरुवातीला स्थायी समिती सभापती पदावर भाजपच्या जया माखिजा यांचा विजय होणार, हे निश्चितच होते; मात्र शिवसेनेने भाजपचेच विजय पाटील यांना उमेदवारी देऊन या निवडणुकीला कलाटणी दिली. समसमान 8 मतदान झाल्याने नशिबाचा खेळ चिठ्ठीवर होणार असे चित्र असतानाच भाजपचे स्थायी सदस्य डॉ. प्रकाश नाथानी यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने भाजप संख्याबळा अभावी बॅकफूटला गेली. नाथानी यांच्या राजीनाम्याने महाविकास आघाडी 8 व भाजपा 7 असे संख्याबळ झाल्याने शिवसेनेच्या विजय पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांनी प्रभावशाली यंत्रणा हाताळली महाआघाडीतील 7 सदस्य व उमेदवार विजय पाटील यांना ठाण्यातील टिपटॉप प्लाझा व सत्कार या हॉटेलमध्ये ठेवले. तेथूनच पीठासीन अधिकारी असलेले जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या देखरेखीखाली निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी शिवसेनेचे विजय पाटील यांना 8 व भाजपाच्या जया माखिजा यांना 7 मते मिळाली आणि अपेक्षेनुसार स्थायी समिती सभापती पदाची माळ विजय पाटील यांच्या गळ्यात पडली.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर लीलाबाई आशान, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपमहापौर भगवान भालेराव, सभागृह नेते भारत गंगोत्री, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर, धनंजय बोडारे, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, अरुण आशान, दिलीप गायकवाड, कैलास तेजी, संदीप गायकवाड आदी उपस्थित होते. विजय पाटील यांच्या विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करून व्यक्त केला. सहायक पोलिस आयुक्त डी. डी. टेळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर सुरडकर, सहायक पोलिस निरीक्षक बजरंग झेंडे, ईश्वर कोकटे, महिला उपनिरीक्षक प्रियंका सादळकर यांनी यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला होता.


विजय पाटील यांचा विजय हा शिवसेनेने केलेल्या विकासकामांवर विश्वास असल्याचे प्रमाण आहे. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज सादर केला आणि आम्ही आमच्यावरील विश्वास सार्थक करून दाखवला.
 - डॉ. श्रीकांत शिंदे खासदार

30 वर्ष राजकारणात असून त्यातील अधिकांश कालावधी हा शिवसेनेसोबतचा आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिली, त्याचे चीज करून दाखवणार.
- विजय पाटील, नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती

--------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com