ते आले.. अन् अश्लील चाळे करत त्यांनी आमच्यासमोरच हस्तमैथून केलं

गार्गी महिला महाविद्यालयातील घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवरील कारवाईसाठी आंदोलन करताना विद्यार्थीनी.
गार्गी महिला महाविद्यालयातील घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवरील कारवाईसाठी आंदोलन करताना विद्यार्थीनी.

मुंबई ः दिल्लीमधील गार्गी महिला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक महोत्सवामध्ये महाविद्यालयाच्या भिंतींवरुन उड्या मारुन घुसखोरी करत विद्यार्थिनींची छेड काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेकडोच्या संख्येने आगंतुकपणे आलेल्या पुरुषांच्या एका गटाने मुलींचा विनयभंग केल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. घुसखोरी केलेल्या या पुरुषांनी विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केले तसेच काहींनी विद्यार्थिनींसमोर हस्तमैथून केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

घडलेल्या प्रकारात कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी विद्यार्थिनींनी निदर्शने केली. घुसखोरी करून गैरकृत्ये करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मात्र अनेक विद्यार्थिनींनी लेखी तक्रार देऊनही महाविद्यालयाने कारवाई करण्यास नकार दिला आहे.

नक्की काय घडलं?

६ फेब्रुवारीला महाविद्यालयाचा सांस्कृतिक महोत्सव झाला होता. त्यावेळी आलेले वाईट अनुभव विद्यार्थिनींनी इन्स्टाग्रामवर वर्णन केले आहेत. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने याबाबत तक्रार करूनही कुठलीच कारवाई केली नाही. दिल्लीत या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर जलद कृती दल व दिल्ली पोलीस तैनात असतानाही गैरकृत्ये झाली तेव्हा त्यांनी बेशिस्त जमावाला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. यातून सुरक्षेचा पूर्ण अभाव दिसून आला असून विद्यार्थिनींच्या अंगाला हात लावण्यात आला, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हे सर्व पुरूष तिशीतले होते असंही या विद्यार्थिनींचं म्हणणं आहे.

विद्यार्थिनीशी अश्लील चाळे

महाविद्यालयाने सुरक्षा ठेवल्याचे सांगितले होते पण देशातील कुठल्या महाविद्यालयाच्या आवारात असले प्रकार घडले असतील असे वाटत नाही, असे मत एका विद्यार्थिनीने व्यक्त केले. “आम्ही आमच्या महोत्सवाची तयारी करत असताना अचानक काही पुरुष महाविद्यालयाच्या आवारामध्ये शिरले. आणि त्यांनी विद्यार्थीनींची छेड काढायला सुरुवात केली,” असं एका विद्यार्थिनीने सांगितलं.

राज्यशास्त्राच्या एका विद्यार्थिनीने सांगितले की, “काही पुरुषांनी प्रवेशद्वारावरून उडय़ा मारल्या. काहींनी दारे तोडण्याचा प्रयत्न केला, काही भिंतीवरून खाली उतरले. त्यांनी आवारात आल्यानंतर विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. काही मुली प्रसाधनगृहाकडे पळाल्या व आत कोंडून घेतले.” बीएस्सीच्या विद्यार्थिनीने सांगितले की, “या प्रकरणी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे ७ फेब्रुवारीला तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी याची दखल घेतली आहे एवढे सांगून बोळवण करण्यात आली.”

“आमच्यासमोरच हस्तमैथून केलं”

“हे पुरुष महाविद्यालयाच्या आवारात शिरल्या शिरल्या दारुची दूर्गंधी पसरली. आम्ही सर्वजणी आमच्या जीवाच्या आकांताने आमच्या वर्गांकडे पळालो तर काहीजणी बाहेरच्या दिशेने पळाल्या. त्या पुरुषांपैकी काही जणांनी अगदी मेट्रो स्टेशनपर्यंत मुलींचा पाठलाग केला,” असं एका विद्यार्थिनीने सांगितलं. तर दुसऱ्या एका विद्यार्थिनीने पूर्ण नियोजन करुन ही हुल्लडबाजी करण्यात आल्याची शंका व्यक्त केली आहे. “आमच्या महाविद्यालयावर हा हल्ला पूर्ण नियोजन करुनच करण्यात आला होता असं दिसतयं. हे पुरुष आमच्या या मोहोत्सवाची वाटच पाहत होते.

संधी साधून ते विद्यापिठाच्या आवारात घुसले आणि त्यांनी आमची छेड काढली. ज्या महविद्यालयाच्या आवारात आम्हाला सुरक्षित वाटले पाहिजे तिथेच आमची छेड काढण्यात आली. आमच्या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक आहेत पण त्यांना अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना हाताळण्याचा अनुभव नाही,” असं एका विद्यार्थीनीने म्हटलं. बॉटनीच्या अभ्यासक्रमाला असणाऱ्या एका विद्यार्थीनीने “राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनींने महाविद्यालयाच्या आवारात शिरलेल्या या पुरुषांनी आमच्यासमोरच हस्तमैथून केल्याचं आम्हाला सांगितलं. हे सर्व पुरुष मध्यमवयीन होते,” अशी माहिती दिली.

प्राथमिक माहिती अहवाल दाखल

दरम्यान गार्गी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिल्ली पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला आहे. हौज खास पोलीस ठाण्यात भादंवि ४५२, ३५४, ५०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला आयोगाकडून नोटिसा

दरम्यान दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी महाविद्यालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दिल्ली महिला आयोगाने महाविद्यालय व पोलीस यांना नोटीस जारी केली आहे. दक्षिण दिल्लीचे पोलीस उपआयुक्त अतुल कुमार ठाकूर यांनी सांगितले की, या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल. अतिरिक्त पोलीस उपआयुक्त गीतांजली खंडेलवाल यांनी चौकशीची सूत्रे हाती घेतली आहे

विनयभंगाबाबत सीबीआय चौकशी नाही
महिलांच्या गार्गी महाविद्यालयातील सांस्कृतिक महोत्सवात काही विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याची ‘सीबीआय’ चौकशी करावी, अशा मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी वकील एम. एल. शर्मा यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे केली. त्या वेळी ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात सादर करण्याचे निर्देश बोबडे यांनी दिले.

The shocking incident in the Gargi Mahila College in Delhi

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com