शीव-पनवेल महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे विघ्न; काेट्यवधींचा खर्च पाण्यात?

सुजित गायकवाड
Tuesday, 1 September 2020

पावसाने आठवडाभर जोरदार वर्षाव केल्याने शीव-पनवेल महामार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीचे बिंग फुटले. मार्गावरील पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सीबीडी-बेलापूर उड्डाणपुलाखाली सर्कलवर मोठे खड्डे पडले आहेत

नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावरील वाशी ते कळंबोलीदरम्यान गेल्या वर्षी ठिकठिकाणी कॉंक्रिटीकरण करण्यात आले होते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल 70 कोटी रुपये खर्च केले होते, परंतु त्यानंतरही या मार्गावर सीबीडी, नेरूळ, जुईनगर आणि वाशी येथे रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

हे वाचा : नागपूरमध्येही धारावी पॅटर्न

पावसाने आठवडाभर जोरदार वर्षाव केल्याने शीव-पनवेल महामार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीचे बिंग फुटले. मार्गावरील पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सीबीडी-बेलापूर उड्डाणपुलाखाली सर्कलवर मोठे खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडल्याने वळण घेताना एखाद्या होडीप्रमाणे चार चाकी वाहने हेलकावे खातात. त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास कार्यालये सुटल्यावर वाहनांची गती कमी होऊन वाहतूक कोंडी होते. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर डी. वाय. पाटील स्टेडियमसमोरील उड्डाणपुलावरील खड्डेही तापदायक झाले आहेत. या ठिकाणी चार ते पाच इंचाचे मोठे खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी बसवण्यात आलेले पेव्हर ब्लॉकही निघाले आहेत. 

हे वाचा : गौरव आर्याची ईडीकडून चौकशी

नेरूळला एलपी उड्डाणपुलावर चढण्याआधी 10 मीटर अंतरावर खड्डे पडले आहेत. तसेच रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने खडी एका बाजूला आली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. पनेवलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर नेरूळ एलपी उड्डाणपुलावरही भले मोठ्ठे खड्डे पडले आहेत. जुईनगर येथे वळण घेताना काही ठिकाणी खड्डे पडलेले दिसतात. सानपाडा उड्डाणपुलावर खड्डे पडले होते; मात्र ते बुजवण्यात आले आहेत. 
वाशी येथे उड्डाणपुलाखालील रस्त्याची चाळण झाली आहे. 

कॉंक्रिटीकरणावर 70 कोटींचा खर्च 
शीव-पनवेल महामार्गावर दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण झाले होते. हे खड्डे फक्त डांबरी रस्त्याच्या भागात पडत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत साडेचार किलोमीटर अंतरावरील डांबरी भाग काढून त्या ठिकाणी 70 कोटी रुपये खर्च करून कॉंक्रिटीकरण केले. आता पुन्हा या रस्त्यावर खड्डे पडल्याने उरलेला डांबरी भागसुद्धा कॉंक्रिटीकरण केला जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता किशोर पाटील यांनी दिली. 

येथे खड्डेच खडे 
- सीबीडी-बेलापूर उड्डाणपुलाखाली सर्कलजवळ 
- नेरूळ उरण फाटा उड्डाणपूल 
- एलपी उड्डाणपूल 
- वाशी सर्कल 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the Sion-Panvel highway, between Vashi and Kalamboli, potholes have fallen again