घेणं ना देणं..! नागरिकांना बसतोय तीन हजारांचा भुर्दंड...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

घणसोलीतील काही भागात गाड्यांच्या काचा फोडण्याचे सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री सात कारच्या काचा फोडण्यात आल्याचे आढळले आहे. अज्ञात व्यक्तीकडून या काचा फोडण्यात येत आहेत; मात्र, वाहनमालकांना याचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

नवी मुंबई : घणसोलीतील काही भागात गाड्यांच्या काचा फोडण्याचे सत्र सुरूच आहे. शनिवारी रात्री सात कारच्या काचा फोडण्यात आल्याचे आढळले आहे. अज्ञात व्यक्तीकडून या काचा फोडण्यात येत आहेत; मात्र, वाहनमालकांना याचा नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे ते हतबल झाले असून, त्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात यावी, यासाठी परिसरातील वाहनमालकांनी एकत्र येऊन रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

ही बातमी वाचली का? मुली आणि महिलांना आकर्षित करतात हे गेम्स...

घणसोली येथील डी-मार्टलगत असणाऱ्या रिद्धीसिद्धी इमारतीसमोर व साई सदानंदनगर परिसरात कारचालक आपली वाहने उभी करतात; परंतु रात्री 3 ते 5 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्ती येते. मोठा दगड काचेवर आपटते. हा प्रकार गेल्या महिन्यापासून नियमित सुरू आहे. यामुळे आजतागायत 70च्या आसपास कारच्या काचा फोडल्या असल्याचे कारमालक नितीन बनसोडे यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? प्रकल्पग्रस्त झाले आक्रमक, 16 मार्चला मंत्रालयावर धडक

जी व्यक्ती कारची काच फोडते, ती कारमध्ये असणारे कोणतेही किमती साहित्य चोरी करत नाही; परंतु वाहनांची काच फोडल्यामुळे कार मालकाला दोन तीन हजार रुपयांचा नाहक खर्च करावा लागतो. आधीच व्यवसायात मारामारी असताना हा नाहक भुर्दंड वाहनमालकाला पडत असल्याने मालक भयभीत झाले असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे काचा फोडणाऱ्या व्यक्तीला पाळत ठेवून अटक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करण म्हात्रे यांनी केली आहे. याबाबत रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश गावडे यांना विचारले असता, काचा फोडणाऱ्या अज्ञात व्यक्तीला लवकरच पकडले जाईल, असे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smashing glass of car window in ghansoli navi mumbai