विशेष लेख : जैविक युद्धावर विज्ञानाची मात्रा - आशीषकुमार चव्हाण

विशेष लेख : जैविक युद्धावर विज्ञानाची मात्रा - आशीषकुमार चव्हाण

मुंबई - पुढील काळात प्रत्येक देश किंवा देशांचा समूह आधुनिक जैविक शस्त्रे तयार करण्याचा अट्टहास धरणार आहे. त्यासोबतच जगाच्या पाठीवर टिकून राहण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवण्याचाही प्रयत्न विविध देशांकडून केला जाईल. अदृश्‍य स्वरूपातील हे युद्ध मानवी वंशावर आघात करणारे आहे. प्रत्येक देशाने जैविक शस्त्रांच्या वापराबाबत आपली भूमिका निश्‍चित केली पाहिजे.

नागरिकांचा जैविक शस्त्रांपासून बचाव करण्यासाठी एखाद्या देशाकडे कोणत्या उपाययोजना किंवा किती क्षमता आहे यावरून 2020 नंतर संबंधित देशाची क्षमता ठरवली जाईल. आतापर्यंत झालेल्या कोणत्याही 10 पैकी 9 युद्धांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची बाजू वरचढ असलेला देश किंवा समूह विजयी ठरला आहे. उदाहरणार्थ सांगायचे झाल्यास दुसऱ्या महायुद्धात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली होती.

दुसरे महायुद्ध हे पहिले महायुद्ध आणि स्पॅनिश फ्लूचे परिणामस्वरूप असले तरीही त्यानंतर आलेली जागतिक मंदी, अमेरिकेचा नवा करार आणि जागतिक राजकारण यांनी जगाची दिशा बदलली. त्यामुळे नंतर जगाला युरोपीय देशांची कमी झालेली ताकद आणि अमेरिका तसेच जपानसारख्या नवशक्तींचा झालेला उदय बघावा लागला. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धात विज्ञान-तंत्रज्ञानाची भूमिका वाढलेली दिसली. अनेक नव्या धाटणीच्या मोटारी, रणगाडे, मोठमोठी जहाजे, आधुनिक विमाने, युद्धासाठी लागणाऱ्या रसदीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. त्यासाठी जर्मनी, इंग्लंड आदी देशांनी युद्धासाठी लागणारे साहित्य बनवण्यासाठी त्यांच्याकडील औद्योगिक क्षमता वापरली. अधिक स्पष्ट बोलायचे झाले तर उद्योग क्षेत्रात काम करणारा प्रत्येक व्यक्ती हा अप्रत्यक्षपणे युद्धात सहभागी झाला होता. गेल्या काही वर्षांपासून इंग्लंड आणि मित्रराष्ट्रांनी अनेक देश जिकून ताब्यात घेतल्याने त्यांच्याकडे मोठी लष्करी शक्ती असताना, प्रचंड शक्ती असताना विरोधी राष्ट्रांनी तुल्यबळ लढत दिली. इंग्लंडकडे असलेली शक्ती ही केवळ कागदावरच दिसत होती. त्यामुळे हे युद्ध बरीच वर्षे चालत राहिल्याने त्यात लाखो लोकांचा बळी गेला; मात्र जगाला स्पष्टपणे कोणी विजयी देश दिसला नाही.

अणूच्या केंद्रकातील हजारो कण हे शक्तिशाली बंधनाने केंद्रकाशी बांधलेले असतात, असे तत्त्व अणुविज्ञान शास्त्रात सांगितले आहे. त्याचा वापर युद्धात करण्यासाठी युरोपीयन देशांत बराच गृहपाठ आणि वैचारिक आदान-प्रदान केले गेले. एखाद्याने अणुविज्ञान शास्त्राचा वापर करताना साखळी अभिक्रिया (चेन रिऍक्‍शन) मोडून अणूच्या केंद्रकातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर युद्धासाठी केल्यास त्यातून मानवाने कधीही न बघितलेला शक्तिशाली स्फोट झाला असता. शास्त्राचा युद्धासाठी वापर ही केवळ स्पर्धा ठरू पाहत होती. जर्मनीने तर त्यांना माहिती असलेल्या विज्ञानाच्या आधारे अणुबॉम्ब तयार करायला सुरुवातही केली होती. रशिया, इंग्लंड आणि इतर अनेक लोकांनी स्वतःच्या युद्ध प्रकल्पांवर कामही सुरू केले होते. दुसरीकडे जर्मनी व इतर देशांकडून ज्यू लोकांना मारले जात असल्याने ज्यू लोक अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना तसेच इतर देशांत स्थलांतर करत होते. तसेच अमेरिका ही नवी शक्ती म्हणून उदयास येत होती; मात्र सुरुवातीला अमेरिकेचासुद्धा सक्रिय सहभाग नव्हता. अमेरिकेने आपल्या बाजूने युद्धात सहभागी करून घेण्यासाठी इंग्लंडने अथक प्रयत्न केले; मात्र युरोपीयन देशांपासून अमेरिका भौगोलिकदृष्ट्या बराच लांब असल्याने अमेरिका युद्धजन्य परिस्थितीपासून दूरच होता.

दरम्यानच्या काळात अमेरिकेने अनेक युरोपीयन तसेच ज्युईश वैज्ञानिकांचे देशात स्वागत केले. त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था केली. त्यांना अमेरिकेतील विद्यापीठात शिकवण्याची संधी दिली. तसेच संशोधन करण्यासाठी त्यांना प्रयोगशाळा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे अमेरिकेच्या विज्ञानजगतात नवे वारे वाहू लागले. अमेरिकेत येऊन संशोधन करणाऱ्या संशोधकांमध्ये अल्बर्ट आईनस्टाईन यांचाही समावेश होता. त्यांच्यासारखे अनेक वैज्ञानिक अमेरिकेतील वेगवेगळ्या विज्ञापीठांमध्ये संशोधन करू लागले. त्यातूनच पुढे अमेरिकेने मेक्‍सिकोनजीक असलेल्या वाळवंटातील प्रसिद्ध लॉस अलामोस प्रयोगशाळेत पहिल्या अणुबॉम्बची गुप्तपणे निर्मिती केली. अमेरिकेप्रमाणेच इतर देशही अणुबॉम्ब तयार करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्या सर्वांमध्ये अमेरिकेने सर्वप्रथम 16 जुलै 1945 रोजी पहिली अणुचाचणी घेतली. इतर देशांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी नवी स्पर्धा सुरू झाली आणि अमेरिका त्या स्पर्धेत विजयी झाली. त्यातूनच पुढे अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अनुक्रमे 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी अणुबॉम्ब टाकले. त्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला आणि अखेर जपानने अमेरिकेपुढे शरणागती पत्करली.
पुढच्या 70 वर्षांत रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान आणि इतर अनेक देशांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अणुचाचण्या घेतल्या. तसेच अमेरिका आणि रशिया यांच्यात अणुहल्ल्याच्या इशाऱ्यावरून 40 वर्षांहून अधिक काळ शीतयुद्ध सुरू होते. गमतीचा भाग म्हणजे अणुशक्ती असलेला प्रत्येक देश इतर देशाने अणुशक्तीचा वापर करू नये म्हणून प्रयत्न करताना दिसत आहे; मात्र अणुशक्तीचा वापर करताना खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचा गैरवापर झाल्यास संपूर्ण पृथ्वीतलाचा नाश होण्यास वेळ लागणार नाही. तसेच महायुद्धानंतरच्या 70 वर्षांच्या काळात अनेक देशांनी इतर देशांकडून अणुशक्ती मिळवण्यासाठी करार केले.

जागतिक महायुद्धासारखीच परिस्थिती आता 2020 मध्येही निर्माण झाली आहे. जगातील काही देशांकडे जैविक बॉम्बची निर्मिती, नियंत्रण आणि त्याच्या वापराबाबत माहिती उपलब्ध आहे. अणुबॉम्बप्रमाणेच जैविक बॉम्बचा वापर अन्य देशांकडून होऊ नये म्हणून अनेक देशांकडून प्रयत्न केले जात आहेत. कोणताही गोळीबार, बॉम्बहल्ले, धुमश्‍चक्रीशिवाय जैविक शस्त्रे लाखो लोकांचा बळी घेऊ शकतात. अशा प्रकारची अनेक जीवघेणी जैविक शस्त्रे तयार केली जाऊ शकतात, ती साठवून ठेवता येतात आणि गरजेनुसार त्याचा वापरही केला जाऊ शकतो.

मानवाच्या जीवावर उठलेल्या या जैविक युद्धात देशातील प्रत्येक नागरिकाला, समाजाला त्यांची इच्छा नसतानाही सहभागी व्हावे लागणार आहे. पुढील काळात प्रत्येक देश किंवा देशांचा समूह आधुनिक जैविक शस्त्रे तयार करण्याचा अट्टहास धरणार आहे. त्यासोबतच जगाच्या पाठीवर टिकून राहण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवण्याचाही प्रयत्न विविध देशांकडून केला जाईल. अदृश्‍य स्वरूपातील हे युद्ध मानवी वंशावर आघात करणारे आहे. प्रत्येक देशाने जैविक शस्त्रांच्या वापराबाबत आपली भूमिका निश्‍चित केली पाहिजे.

सध्या जगभरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जागतिक संरचना बदलत चालली आहे. संयुक्त राष्ट्रे, जागतिक बॅंक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक व्यापार संघटना, जी- 7, जी- 20 आदी संघटनांचा संबंध कोरोनाविरुद्धच्या लढाईत फार कमी झाला आहे. कोरोनानंतरच्या परिस्थितीत जागतिक संरचना पूर्णपणे बदललेली असेल. त्यात आपली भूमिका काय असणार आहे? भारत देश त्यासाठी तयार आहे का? स्वातंत्र्यानंतरच्या काळात जागतिक पातळीवर स्थान मजबूत करण्यासाठी आपल्या देशाने जी भूमिका घेतली नव्हती, ती भूमिका आता घेणे आवश्‍यक आहे. आव्हानांचा सामना करून त्यावर काम करावे लागणार आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर पेनिसिलीनच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनामुळे तसेच प्रतिजैविक आणि औषधांच्या उपलब्धतेमुळे 70 ते 80 वर्षांत जागतिक लोकसंख्या तीन ते चार पट वाढली. जीवाणुजन्य आजारांवरील उपाय म्हणून पेनिसिलीनचा शोध हा जागतिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा ठरला. आता कोरोनाच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा नवी संधी मिळाली आहे. त्यासाठी आपल्याला नव्याने विचार करावा लागणार आहे. नवी दिशा, नवी संधी, नवे मेंदू, नवीन कल्पनांच्या, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्या संकटावर नक्कीच मात करता येईल.

(लेखक मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.) अनुवाद - ऋषिराज तायडे 

special article on biological warfare and biological weapons by ashishikumar chavan 


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com