
एसटीची लालपरी रुळावर; उत्पन्न वाढीलाही वेग
मुंबई : एसटीच्या संपामुळे ठप्प झालेली एसटीची प्रवासी सेवा आता हळूहळू रुळावर येत आहे. 22 एप्रिल पर्यंत 90 टक्के एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले असून, गाव तिथे एसटी दिसायला लागली आहे. त्याप्रमाणे एसटीच्या वाटेत असलेल्या नागरिकांनीही एसटीच्या सुरू झालेल्या सेवेला पुन्हा चांगला प्रतिसाद देत सध्या 12 हजार 323 एसटी बसेस राज्यभरात प्रवासी सेवा देत आहे. तर प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे.
एसटीच्या विलीनीकरणासाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आणि बेकायदा संप तब्बल पाच महिने भरकटला त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपले वेतन गमवावे लागले, परिणामी एसटीच्या सेवा कोलमडल्या, सामान्य परिस्थितीत एसटीचे दैनंदिन 22 कोटींचे उत्पन्न होते. तर दिवसाला 65 लाख प्रवासी वाहतुक केली जात असताना आता उत्पन्नावर आणि प्रवासी संख्येवर प्रचंड परिणाम झाला आहे. परंतु 16 एप्रिल नंतर एसटीच्या सेवा पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे.
6 हजार 900 बसेस मधून 12 लाख 94 हजार प्रवासी सेवा दिल्या जात असतांना आता सुमारे 12 हजार 323 बसेस मधून तब्बल 23 लाखांपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे. त्यासोबतच संपकाळात अंशतः सेवा सुरू असताना 6 ते 9 लाखांच्या घरात असलेले उत्पन्नामध्येही वाढ होतांना आता दिसून आले आहे। आता 10 कोटीं पेक्षा जास्त दैनंदिन उत्पन्न होत असून, या आठवड्यात तब्बल 14 कोटींच्या उत्पन्नाची सुद्धा नोंद झाली आहे.