एसटीने जाणले प्रवाशांचे मोल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

एसटी महामंडळासमोर उत्पन्न वाढवण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी रायगड विभागाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यातील आगारात सर्वोत्कृष्ट कामगिरी करून उत्पन्नामध्ये वाढ करणाऱ्या आगारांना पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यानुसार प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आगाराला 2 लाख, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या आगारास दीड लाख आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या आगाराला एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत.

अलिबाग : एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी रायगड विभागाने चालकांना इंधनबचतीचे धडे दिले आहेत. त्यानंतर प्रवाशांना चांगली सेवा देण्याबरोबरच त्यांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर 1 मार्च ते 30 एप्रिलदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर "उत्पन्न वाढवा' हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे चांगली कामगिरी करणाऱ्या आगाराला बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे; तर कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षाही करण्यात येणार आहे. 

हे वाचा : गणेश नाईकांना धक्का  
एसटी महामंडळासमोर उत्पन्न वाढवण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी रायगड विभागाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यातील आगारात सर्वोत्कृष्ट कामगिरी करून उत्पन्नामध्ये वाढ करणाऱ्या आगारांना पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यानुसार प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आगाराला 2 लाख, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या आगारास दीड लाख आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या आगाराला एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत. तर निकृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारातील बेजबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षा म्हणून त्यांचे गोपनीय अहवाल राखून ठेवणे, त्यांची गैरसोईच्या ठिकाणी बदली करणे आदी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. 

रायगड जिल्ह्यात अलिबाग, मुरूड, रोहा, माणगाव, महाड, श्रीवर्धन, पेण, कर्जत असे आठ एसटी बस आगार आहेत. 

धक्कादायक : फणसाडमधील कॅमेरे गायब 

जनजागृती करणार 
"एसटीचे उत्पन्न वाढवा' या विशेष अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात 22 फेब्रुवारीपासून प्रचार करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक आगारात चालक, वाहक, पर्यवेक्षक, पालक अधिकारी, आगार व्यवस्थापक यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रवासीसंख्या वाढविण्याचे आवाहन केले जाणार आहे. 

"उत्पन्न वाढवा अभियान' हा चांगला उपक्रम आहे. त्यामुळे प्रवासीसंख्येत वाढ होऊन एसटीच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 
- अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, रायगड एसटी महामंडळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST understands the value of travelers