नवी मुंबईकरांचा लोकलमध्ये 'दे धक्का!'; राष्ट्रवादीचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 19 February 2020

नेरूळ ते सीएसएमटी मार्गावर सकाळच्या वेळी 2 विशेष लोकल चालविण्यात याव्यात, या मागणीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नेरूळ रेल्वेस्थानकात निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.

नवी मुंबई : नेरूळ ते सीएसएमटी मार्गावर सकाळच्या वेळी 2 विशेष लोकल चालविण्यात याव्यात, या मागणीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नेरूळ रेल्वेस्थानकात निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने रेल्वेच्या प्रबंधकांची भेट घेऊन, येत्या महिनाभरात आपल्या मागणीसंदर्भात विचार न केल्यास "रेल्वे रोको' आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

ही बातमी वाचली का? कर्नाळा बॅंक घोटाळा; विवेक पाटलांसह 76 जणांवर गुन्हा दाखल 

नवी मुंबईतील नेरूळ हा नोड सर्वात मोठा नोड असून, या नोडची लोकसंख्या सुमारे 4 लाख इतकी आहे. येथील रेल्वेस्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या इतर रेल्वेस्थानकांपेक्षा दुपटीने आहे. नेरूळ स्थानकातून मुंबईत कामानिमित्त लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी, या स्थानकातून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पाय ठेवायलादेखील जागा मिळत नाही. त्यांना गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये धक्के खात दरदिवशी कामाच्या ठिकाणी जावे लागते. महिला, वृद्ध नागरिकांची यात मोठी फरपट होते. हे त्यांच्या जीवावर देखील बेतू शकते. त्यामुळे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सकाळच्या सुमारास 8 ते 10 वाजेच्या कालावधीत नेरूळ रेल्वेस्थानकातून 2 विशेष लोकल सीएसएमटीसाठी सोडण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा सरचिटणीस व प्रवक्ते अफसर इमाम यांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा केली. त्याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करून, त्याचा पाठपुरावादेखील केला. मात्र, रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या वतीने प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी नेरूळ रेल्वेस्थानकात निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा सरचिटणीस व प्रवक्ते अफसर इमाम, जी. एस. पाटील, सय्यद हकीम, फईम खान या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 

ही बातमी वाचली का? नवी मुंबईकरांची करवाढीतून मूक्तता! अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर 

"रेल रोको' आंदोलनाचा इशारा 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आंदोलनकर्त्यांनी नेरूळ रेल्वे स्टेशन प्रबंधकांची भेट घेऊन, त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. तसेच येत्या 30 दिवसात आपल्या मागणीचा विचार झाला नाही, तर रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. रेल्वेच्या प्रबंधकांनी त्यांच्या मागणीचे पत्र रेल्वे प्रशासनाकडे पाठवून, त्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: starts two special locales on the Nerul-CSMT route