धक्कादायक... रस्त्यावरील सळीने घेतला विद्यार्थ्याचा बळी!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020

मुंबई : सायकलवरून जाताना रस्त्यावरील खडीवरून घसरून पडल्याने डोळ्यात लोखंडी सळी घुसून जखमी झालेल्या दहावीतील विद्यार्थ्याचा अखेर मृत्यू झाला आहे. विवेक घडशी (वय 15) असे त्याचे नाव असून 5 मार्च रोजी त्याला अपघात झाला होता. त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सहा दिवसांनंतर बुधवारी (ता. 11) दुपारी त्याचा मृत्यू झाला. 

मुंबई : सायकलवरून जाताना रस्त्यावरील खडीवरून घसरून पडल्याने डोळ्यात लोखंडी सळी घुसून जखमी झालेल्या दहावीतील विद्यार्थ्याचा अखेर मृत्यू झाला आहे. विवेक घडशी (वय 15) असे त्याचे नाव असून 5 मार्च रोजी त्याला अपघात झाला होता. त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सहा दिवसांनंतर बुधवारी (ता. 11) दुपारी त्याचा मृत्यू झाला. 

हे वाचलं का? : आता शाळकरी मुलांच्या `या` गोष्टी रेशनच्या दुकानात मिळणार...

घाटकोपर पश्‍चिम परिसरातील कातोडीपाड्यात राहणारा विवेक दहावी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी सायकलवरून मित्राकडे जात होता. मलनिस्सारण वाहिनीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या खडीवरून सायकल घसरल्याने तोल जाऊन पडल्याने त्याच्या डाव्या डोळ्यात सळी घुसली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहा दिवस तो कोमात होता. मात्र, बुधवारी त्याचा मृत्यू झाला. संबंधित कंत्राटदाराची न्यायालयात जामिनावर सुटका झाली होती. मात्र, विवेक मृत झाल्यामुळे कंत्राटदारांविरोधात 307 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. 

हेही वाचा : मेट्राे-४ मार्गिकेचे काम `या` कारणामुळे थंडावले! ​

पालिका कंत्राटदारांचा निष्काळजीपणा आणखी किती बळी घेणार? 
विवेक घडशीच्या अपघाती मृत्यूनंतर घाटकोपरच्या भीमनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक दोन वर्षांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक विभागात पालिकेची विकासकामे सुरू आहेत. मात्र, कंत्राटदार नागरिकांच्या जीवाची कोणतीही काळजी न घेता बांधकामे करीत असल्याचे चित्र आहे. नाल्यांचे रुंदीकरण, मलनिस्सारण वाहिन्यांची कामे, रस्त्याची डागडुजी आदी अनेक कामे पालिकेने कंत्राटदारांना दिली आहेत. कंत्राटदार कासवगतीने कामे करताना दिसून येत आहेत. काही कामे तर अर्धवटच आहेत. लोखंडी सळ्या, बॅरिकेट्‌स आणि सिमेंटचे ढापे उघड्यावर पडून आहेत. बेफिकीर कंत्राटदारांना नागरिकांच्या जीवाशी काहीच घेणे-देणे नसल्याचे दिसते. कंत्राटदाराच्या अशाच निष्काळजीपणाचा बळी विवेक ठरला. घाटकोपरच्या जीवदया लेन मार्गावरही पालिकेच्या कंत्राटदाराकडून गटाराचे काम सुरू आहे. तिथेही लोखंडी सळ्या उघड्या आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A student dies after being hit by an iron rod in the road