उपचारांसाठी "ब्ल्यू बेबी'ने पार केले दोन देशांतील अंतर! जन्मजात हृदयविकार असलेल्या बाळावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया

उपचारांसाठी "ब्ल्यू बेबी'ने पार केले दोन देशांतील अंतर! जन्मजात हृदयविकार असलेल्या बाळावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया


मुंबई: इराकमध्ये जन्मलेल्या चिमुकल्याला दुर्मिळ अशा आजाराने ग्रासले होते. बाळाच्या हृदयामध्ये गंभीर स्वरूपाची गुंतागुंत होती. रक्ताभिसरण बिघडल्याने त्याचे अंग निळसर पडले होते. अशा "ब्ल्यू बेबी'ने उपचार घेण्यासाठी दोन देशांतील अंतर आणि कोविडचे आव्हान पार करत थेट मुंबई गाठली. त्याच्या हृदयविकारावर मुंबईतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. 

इराकमध्ये जन्मलेल्या व हृदयाच्या जन्मजात विकाराने ग्रस्त असलेल्या अवघ्या महिनाभराच्या बाळाला डी-टीजीए (डेक्‍स्ट्रो-ट्रान्सपोझिशन ऑफ द ग्रेट आर्टरीज) आजार होता. "डी-टीजीए' आजारामध्ये, हृदयातून शरीराकडे रक्त वाहून नेणाऱ्या महाधमनी आणि फुप्फुसीय धमनी अशा दोन मुख्य वाहिन्या त्यांच्या मूळ जागेवरून सरकून एकमेकींची जागा घेतात. हा दोष सुधारण्यासाठी धमन्या मूळ जागेवर बसवण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. या बाळावर ती करावी लागली. हृदयाला पडलेले छिद्र (एट्रियल सेप्टल डिफेक्‍ट) बुजवण्यासाठीही बाळावर शस्त्रक्रिया करावी लागली. त्यातून बाळ पूर्णपणे बरे झाले. बाळाचे रक्ताभिसरण बिघडल्याने अंग निळसर पडले होते. पण आजारातून बरे झाल्यानंतर त्याला घेऊन पुन्हा आपल्या मायदेशी जाण्याच्या विचारात पालक आहेत. 

बाळाच्या हृदयाचा डावीकडील कप्पा किंचित आकुंचन पावला होता. तेथील हृदयाची भिंत पातळ झाली होती. त्यामुळे वाट न पाहता त्याच्यावर 30 सप्टेंबरला शस्त्रक्रिया केली. बाळाच्या हृदयाच्या धमन्या पुन्हा त्यांच्या मूळ जागेवर जोडल्या. फुप्फुसीय धमनी अगदी योग्य अशा रक्तवाहिनीला जोडणे फार महत्त्वाचे होते. शस्त्रक्रियेनंतर पहिले 48 तास अतिमहत्त्वाचे असतात. त्या वेळी आवश्‍यकता भासल्यास, बाळाला "ईसीएमओ' (एक प्रकारचा लाईफ सपोर्ट) देण्याचीही तयारी ठेवली होती. सध्या बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पाच हजार मुलांत एकामध्ये दुर्मिळ आजार 
कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयामधील बाल हृदयरोग चिकित्सा केंद्राचे संचालक डॉ. सुरेश राव म्हणाले, "बाळाचे अंग जन्मतःच निळसर होते. त्याच्या हृदयामध्ये गंभीर स्वरूपाची गुंतागुंत असल्याचे निदान झाले होते. त्याच्या शरीरातील रक्ताभिसरण उलटे होत होते. अशी स्थिती पाच हजार नवजात मुलांमधील एकामध्येच असते. लवकर शस्त्रक्रिया झाली नाही तर बाळ दगावते. भारतात नवजात बालके आणि लहान मुलांवर अशा प्रकारचा शस्त्रक्रिया नेहमीचीच बाब आहे. इराकमध्ये मात्र अशा सोयीचा अभाव असल्यामुळे बाळावर तिथे उपचार होऊ शकले नाहीत. 

इराकमधील रुग्णालयात बाळावर "बीएएस' (बलून एट्रियल सेप्टोस्टॉमी) ही प्राथमिक उपचार पद्धती करण्यात आली होती. हृदयाचे कार्य स्थिर होण्यासाठी ती केली जाते. त्या उपचारांना बाळाने चांगला प्रतिसाद दिला. त्याच्या शरीरातील ऑक्‍सिजनची पातळी वाढली होती. विमानाने भारतात येण्याकरिता त्याची ही स्थिती सहाय्यभूत ठरली. 
- डॉ. सुरेश राव,
बाल हृदयरोग चिकित्सा केंद्राचे संचालक, कोकिळाबेन रुग्णालय.

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com