esakal | मोठी बातमी : सुशांत आणि रियाच्या बँक खात्यांत कोणताही व्यवहार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

rhea sushant

सुशांतच्या बँक खात्यांमधून गैरव्यवहार झाला होता असाही आरोप केला जात होता. त्याच्या खात्यातून रिया चक्रवर्तीच्या खात्यावर पैसे पाठवल्याचे आरोप झाले होते.

मोठी बातमी : सुशांत आणि रियाच्या बँक खात्यांत कोणताही व्यवहार नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याचा तपासाबाबत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी निर्णय दिला. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार आहे. दरम्यान, सुशांतच्या बँक खात्यांमधून गैरव्यवहार झाला होता असाही आरोप केला जात होता. त्याच्या खात्यातून रिया चक्रवर्तीच्या खात्यावर पैसे पाठवल्याचे आरोप झाले होते. या आरोपामुळे मुंबई पोलिसांनी सुशांतच्या सर्व व्यवहारांचे न्यायवैद्यक लेखापरीक्षण केले होते. सोमवारी (ता. १७) हा अहवाल वांद्रे पोलिसांकडे सोपवण्यात आला. या अहवालामध्ये सुशांतच्या खात्यातून कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

सुशांतने 14 जूनला आत्महत्या केल्यानंतर त्याच्या तीन बॅंक खात्यातून मोठ्या प्रमाणावर रक्कम इतर खात्यात वळवल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी सुशांतच्या वडिलांनी पाटण्याच्या (बिहार) पोलिस ठाण्यामध्ये तक्रारही दाखल केली होती. त्या तक्रारीत सुशांतच्या खात्यातून पैसै काढल्याचा आरोप केला होता. यात सुशांतच्या बहिणींनी रिया चक्रवर्तीवर संशय व्यक्त केला. त्यानंतर बिहार पोलिसांच्या पथकाने मुंबईत येऊन बॅंक खात्यांची चौकशी केली होती. सक्तवसुली संचालनालया(ईडी)ने या व्यवहाराची चौकशी सुरू केली आहे. 

हे वाचा - रिया चक्रवर्तीची काढली 'लायकी'; बिहारच्या पोलिस महासंचालकांचं वक्तव्य

करिअरपासूनच्या व्यवहाराची चौकशी 
न्यायवैद्यक लेखापरीक्षणात सुशांतच्या करिअरच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात आली. मात्र तपासात कुठलेही आक्षेपार्ह व्यवहार झाल्याचे आढळून आले नाही. कामगारांचे वेतन, घरभाडे आणि इतर खर्चाचा तपशील या अहवालामध्ये देण्यात आला आहे. 

हे वाचा - बिहारचे DGP म्हणाले, आम्ही बरोबर होतो हे सिद्ध झाले

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने  निकाल दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. सुशांत सिंह राजपूत मुत्यूच्या तपासाबाबत सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय त्याचं आम्ही स्वागत करतो असं अनिल देशमुख म्हणालेत. या केसमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांना जे काही सहकार्य लागेल ते राज्य शासन देईल असंही अनिल देशमुख म्हणालेत. दरम्यान, मुंबई पोलिसांबाबत अभिमानाची गोष्ट म्हणजे , सर्वोच्च न्यायालयाने आपल्या जजमेंटमध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात कोणताही दोष नाहीत असं स्पष्ट म्हटलंय. मुंबई पोलिसांनी केलेला तपास योग्य पद्धतीने झालाय हेही सुप्रीम कोर्टाने म्हटल्याचं नमुद केलं.