सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण! भाजप आमदाराने उपस्थित केले नवे प्रश्न; पोलिस उपायुक्तांना लिहिले पत्र

कृष्ण जोशी
रविवार, 2 ऑगस्ट 2020

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या आत्महत्येनंतर त्याला धमक्या आल्या होत्या का, सुशांतच्या घरी आत्महत्येच्या आदल्या रात्री पार्टी झाली होती का, त्यात कोण उपस्थित होते, त्याने सिमकार्ड का बदलली होती, असे प्रश्न भारतीय जनता पक्षाचे अंधेरी (प.) येथील आमदार अमित साटम यांनी विचारले आहेत. 

मुंबई ः अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या आत्महत्येनंतर त्याला धमक्या आल्या होत्या का, सुशांतच्या घरी आत्महत्येच्या आदल्या रात्री पार्टी झाली होती का, त्यात कोण उपस्थित होते, त्याने सिमकार्ड का बदलली होती, असे प्रश्न भारतीय जनता पक्षाचे अंधेरी (प.) येथील आमदार अमित साटम यांनी विचारले आहेत. यासंदर्भात साटम यांनी पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांना पत्र लिहून असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात या दिशेने तपास करून त्याचे निष्कर्ष जनतेसमोर मांडावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. 

मुंबई पालिकेची मोठी कारवाई, माहिममधल्या 'या' रुग्णालयाची नोंदणी रद्द

सुशांतच्या आत्महत्येपूर्वी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केलेली त्याची मॅनेजर दिशा सॅलियन ही देखील मृत्यूपूर्वी वेगळ्या पार्टीत सहभागी झाली होती का, त्या पार्टीत आणखी कोण आले होते, या दोनही पार्टीला उपस्थित असलेल्यांच्या मोबाईलचे लोकेशन पडताळून याबाबत पोलिसांनी खात्री केली आहे का, या मुद्यांची चौकशी करावी, अशी मागणीही साटम यांनी केली आहे. 

सुशांतच्या मृत्युसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारे संशयकल्लोळ सुरु आहे, सत्य जाणून घेण्याची जनतेची इच्छा आहे. यासंदर्भातील काही मुद्यांची उत्तरे मिळाल्यास हे रहस्य उघड होऊ शकेल, असे सांगून साटम यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. दिशा सॅलियन हिच्या शवविच्छेदन अहवालात नेमके काय म्हटले आहे, कोणत्यातरी पार्टीनंतर तिने आत्महत्या केली का, त्या पार्टीत कोण हजर होते, मृत्यूपूर्वी चोवीस तास आधी ती कोणाला भेटली होती, याचा तपास झाला का, असे साटम यांनी विचारले आहे.  

...त्यांनी मुख्याध्यापिकेला चांगलाच धडा शिकवला; वाचून तुम्हांलाही धक्का बसेल!

दिशाच्या मृत्युनंतर सुशांतसिंह याला धमक्या आल्या होत्या का, किंवा तो भितीच्या वातावरणात होता का, याबाबत त्याने आपल्या बहिणीला काही सांगितले होते का, हे जाणून घेण्यासाठी त्याच्या बहिणीचा जबाब नोंदविला आहे का, सुशांतने 8 जून पासून मृत्युच्या दिवसापर्यंत वेगवेगळी सिमकार्ड का वापरली होती, सुशांतच्या आत्महत्येच्या आदल्या दिवशी त्याच्याघरी किंवा अन्यत्र झालेल्या पार्टीत तो होता का, त्या पार्टीत कोण होते याचा शोध घेतला का, याबाबत इमारतीच्या सुरक्षा रक्षकाचा जबाब घेतला का, सुशांतच्या व्हिसेराची फेरतपासणी करणार का, असे मुद्दे साटम यांनी उपस्थित केले आहेत.

---------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput suicide case! BJP MLAs present new questions; Letter written to the Deputy Commissioner of Police