बेस्ट कामगारांवर बडतर्फीची टांगती तलवार; 'इतक्या' कामगारांना बेस्ट प्रशासनाने बजावल्या नोटिसा.. 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

बेस्ट कामगारांमध्ये सध्या बडतर्फीच्या कारवाईने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  लॉकडाऊन घोषित झाल्यापासून गैरहजर असलेल्या ६०० कामगारांना बेस्ट प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईची अजूनही कामगारांवर टांगती तलवार आहे. 

मुंबई : बेस्ट कामगारांमध्ये सध्या बडतर्फीच्या कारवाईने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  लॉकडाऊन घोषित झाल्यापासून गैरहजर असलेल्या ६०० कामगारांना बेस्ट प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईची अजूनही कामगारांवर टांगती तलवार आहे. 

लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कामगारांसाठी बेस्टने बस सुरू ठेवल्या. मात्र कामगार मोठ्या प्रमाणात गैरहजर असल्याने बस चालविण्यासाठी अडचणी येत होत्या आणि ती अडचण आणूनही जाणवत आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने ६०० कामगारांना नोटिसा पाठविल्या असल्याची माहिती बेस्टने दिली. 

 हेही वाचा: यंदा पावसाळ्यात ट्रेकिंगला जायचंय? ..जरा थांबा; आधी वाचा ही महत्वाची बातमी..  

लॉकडाऊन पूर्वी रस्त्यावर २८०० बेस्ट बस धावत होत्या. ही संख्या लॉकडऊनच्या काळात १७०० पर्यंत आली. या बस चालविण्यासाठीही कामगार उपस्थित नव्हते. आम्ही कामगारांना वेतन देत आहोत मग कामगारांनी कामावर हजर राहिलेच पाहिजे अशी ठाम भूमिका प्रशासनाने घेतली आहे. मात्र सुरक्षा व्यवस्था नसल्याने कामगारांच्या जीविताला धोका पोचू शकतो अशी भूमिका घेत कामगारांच्या गैरहजेरीचे कामगार संघटना समर्थन करीत आहेत.  

बेस्ट बस सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर प्रवाशांची झुंबड उडत आहे. पण कामगार कमी असल्याने बसेस रस्त्यावर काढता येत नाहीत. सध्या अडीच हजार बसेस रस्त्यावर धावत आहेत. एवढ्या गाड्या चालविण्यासाठी कामगारांची कमतरता आहे. त्यामुळेच कामगारांना कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. कारवाईच्या बडग्याने कामगारांनी आणि कामगार संघटनांनी नमते घेतल्याचे समजते. 

बेस्टचे बहुतांश कामगार मुंबईबाहेर राहत आहेत. काही कामगार गावी गेले आहेत. मुंबईत असलेल्या बेस्टच्या अनेक वसाहती क्वारंटाईन केल्या आहेत. त्यामुळे कामगारांची मोठी अडचण झाली आहे. कामगारांना होणारी कोरोनाची वाढती बाधा आणि कोरोना झालेल्या कामगारांच्या मृत्यूमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा: मुंबईकरांनो आता 'इथेही' मास्क वापरणं बंधनकारक; नाहीतर १ हजाराचा दंड..

बेस्ट कर्मचाऱ्यांची कोरोनाची संख्या वाढतच आहे. सरसकट कामगारांना कामावर बोलावण्याच्या प्रशासनाच्या धोरणाला कामगार संघटनांनी विरोध केला आहे. प्रशासनाचा हा निर्णय अविवेकी असल्याचा आरोप बेस्ट कामगार कृती समितीने केला आहे. आता कामावर हजर न राहिल्याबद्दल ६०० कामगारांना नोटिसा पाठविल्याबद्दल कामगार संघटनांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

suspension of absent BEST employees in mumbai read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suspension of absent BEST employees in mumbai read full story