सीआयएसएफ जवानांसोबतच दुजाभाव; 'स्वप्नपूर्ती'तील घरे खाली करण्यासाठी दबाव...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 8 June 2020

खारघर सेक्टर 36 येथे सिडकोने तब्बल साडेतीन हजार घरांची अल्प उत्पन्न व अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी भव्य गृहसंकुल उभारले आहे. या सोसायटीतील वाटप झालेल्या घरांपैकी 60 टक्के खोल्या मालकांनी भाड्याने दिल्या आहेत.

खारघर (बातमीदार) : खारघर सेक्टर 36 येथे सिडकोने तब्बल साडेतीन हजार घरांची अल्प उत्पन्न व अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी भव्य गृहसंकुल उभारले आहे. या सोसायटीतील वाटप झालेल्या घरांपैकी 60 टक्के खोल्या मालकांनी भाड्याने दिल्या आहेत. यात सीआयएसएफ जवानांच्या कुटुंबांचा अधिक समावेश आहे. तळोजा एमआयडीसीतील काही महत्त्वाचे प्रकल्प, ओएनजीसी, जेएनपीटी, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात सुरक्षेचे काम करणारे सीआयएसएफचे जवान खारघर जवळ असल्याने स्वप्नपूर्ती सोसायटीत राहतात. सोसायटीतील तब्बल 500 घरांमध्ये भाडे स्वरूपात ही कुटुंब वास्तव्यास आहेत. सोसायटीत राहणाऱ्या मालकांव्यतिरिक्त या जवानांमुळे सोसायटीत कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, अशी भीती सोसायटीतील काही निवडक लोकांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी थेट सीआयएसएफच्या जवानांविरोधात बिगुल वाजवले असून, घरे खाली करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. 

वाचा ः पहिल्याच दिवशी डोंबिवलीकरांचा कामावर 'लेट मार्क'! अपुऱ्या बससेवेमुळे गोंधळ

देशातील महत्त्वाचे केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे प्रकल्प, कारखाने आणि विमानतळांचे डोळ्यांत तेल घालून संरक्षण करणाऱ्या सीआयएसएफच्या जवानांना सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटीत विरोध केला जात आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे कारण पुढे करून तब्बल 500 कुटुंबांना भाड्याचे घर न देण्याचा फतवा स्वप्नपूर्ती सोसायटीतील काही निवडक लोकांनी घेतला आहे. तसेच सध्या राहत असणाऱ्या जावानांचे करार संपल्यानंतर तत्काळ बाहेर काढण्याची तयारी काही स्वयंघोषित समाजसेवकांनी केली आहे. 

वाचा ः कोरोना रुग्णांना एमजीएम रुग्णालयाचा आधार; जोपासली सामाजिक बांधिलकी

ज्या घरमालकांनी सीआयएसएफच्या जवानांना घरे दिली आहेत, त्यांना करार संपल्यानंतर पुन्हा नवा करार न करण्याच्या तसेच नवीन भाडेकरू म्हणून सीआयएसएफच्या जवानांना घर भाड्याने न देण्याचा फतवा जारी केला आहे. सीआयएसएफच्या जवानांना स्वप्नपूर्ती सोसायटीत नव्याने घर भाड्याने राहण्यास देण्याची परवानगी देऊ नये याकरिता सीआयएसएफचे मुख्यालय, सिडको व नवी मुंबई पोलिसांना तसे लेखी पत्र देण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांनंतरही सिडकोने अद्याप स्वप्नपूर्ती सोसायटीची अधिकृत सोसायटी स्थापन केलेली नाही. गेल्या वर्षभरापासून हौशी कलाकारांना हाताशी घेऊन सोसायटी स्थापन करण्याच्या नाममात्र हालचाली सुरू झाल्या आहेत. सोसायटी अधिकृत व्यक्तींच्या नियंत्रणात नसल्याने काही लोकांची मनमानी सुरू आहे. महत्त्वाच्या प्रकल्पांची सुरक्षा करणाऱ्यांनाच बेघर करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
 

वाचा ः रसिक प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येत आहे 'श्रीयुत गंगाधर टिपरे'; वाचा कधी येणार तर...

स्वप्नपूर्ती सोसायटीतील घरांमध्ये स्वतः मालकांव्यतिरिक्त इतर भाडेकरूंनी राहू नये, अशी सिडकोची अट आहे. त्या अटींनुसार आम्ही सोसायटीतील घरे भाड्याने कोणालाही देऊ नका, अशी मागणी केली आहे. सध्या सोसायटीत सीआयएसएफ व इतर नागरिक असे दोन हजारांहून अधिक भाडेकरू राहत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन घरमालकांनी घरे भाड्याने देऊ नये, असे पत्र आम्ही सिडकोला दिले आहे. 
- भगवान केशभट, स्वप्नपूर्ती सोसायटी सदस्य

स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये अद्याप अॅडहॉक कमिटी नेमलेलीच नाही. सध्या बँक खाते उघडण्यासाठी प्रवर्तक नेमले आहेत. त्यांना खाते उघडण्यापलीकडे कसलेही अधिकार नाहीत. तसेच इतर कोणालाही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे अधिकार प्राप्त झालेले नाहीत. सोसायटीत राहणाऱ्या मालकाच्या घरात कोण भाडोत्री राहील अथवा नाही हा त्या घरमालकाचा अधिकार आहे. या अधिकारात सोसायटी हस्तक्षेप करू शकत नाही.
- केदारी जाधव, सहनिबंधक सहकारी सोसायटी, सिडको

कायद्यानुसार एखाद्या जमातीला अथवा एखाद्या ठिकाणी कामाला असणाऱ्या ठराविक लोकांना वास्तव्यास मनाई करणे अपराध आहे. भाडेकरू ठरवण्याचा अधिकार घरमालकाला आहे. भाडेकरू चुकीचे कृत्य करीत असल्यास त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करू शकता. संपूर्ण समूहाला जबाबदार धरणे गैर आहे.
- अरुण भिसे, अध्यक्ष, सिटीझन युनिटी फोरम पनवेल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swapnpurti society denies to give flats on rent to CISF personnel amid corona outbreak