26/11 मुंबई हल्ल्यातील बालसाक्षीदाराच्या घराच्या आणि शिक्षणाच्या समस्येची दखल घ्या - हायकोर्ट

26/11 मुंबई हल्ल्यातील बालसाक्षीदाराच्या घराच्या आणि शिक्षणाच्या समस्येची दखल घ्या - हायकोर्ट
Updated on

मुंबई, ता. 13  : हलाखीच्या परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या 26/11 मुंबई हल्ला खटल्यातील बालसाक्षीदाराच्या घराच्या आणि शिक्षणाच्या समस्येची दखल घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले.

मुंबई दहशतवादी हल्ला खटल्यात त्यावेळी नऊ वर्षाची असलेल्या देविका रोटावत हिने न्यायालयात याचिका केली आहे. वांद्रे येथील एका चाळीत राहणाऱ्या देविका आणि तिच्या कुंटुंबियांची परिस्थिती हलाखीची आहे. वांद्रेमधील सुभाष नगरमध्ये भाड्याच्या घरात ते सध्या राहतात. मात्र घराचे भाडे न भरल्यामुळे त्यांना आता बेघर होण्याची वेळ आली आहे, त्यामुळे सरकारने एक घर द्यावे अशी मागणी केली आहे. ती सध्या चेतना महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याची मागणीही तीने याचिकेत केली आहे. अनेक अडचणींमुळे तिचे वडील आणि भाऊ घर खर्च चालवू शकत नाहीत, असेही तिने म्हटले आहे. मुंबई हल्ल्यात गोळी लागल्यामुळे तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार केले ज्यामध्ये खूप खर्च झाला आहे, त्यामुळे अपवादात्मक प्रकरण म्हणून दखल घ्यावी अशी विनवणी केली आहे.

याचिकेवर आज  न्या. नितीन जामदार आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राज्य सरकारकडे याबाबत निवेदन दिले आहे, पण त्याची दखल घेतली नाही, असे याचिकादाराकडून एड. उत्सव बेन्स यांनी सांगितले. यावर, न्यायालय रजिस्ट्रारनी याचिका मुख्य सचिव संजय कुमार यांना पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच देविकालाही पुन्हा अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे.

लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदाराने सन 2008 मध्ये मुंबईवर हल्ला केला होता. त्यावेळी सीएसटीवरील हल्ल्यात बंदुकीची एक गोळी तिच्या उजव्या पायाला लागली होती. तिच्याबरोबर तिचे वडीलही होते. पोलिसांनी तीला सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. तिथे तिच्यावर दिड महिन्यात सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.  त्यानंतर सुमारे सहा महिने घरीच सक्तीची विश्रांती घेत होती.

या खटल्यात ती आणि तिचे वडील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. मागील काही वर्षात तीने सरकारला सहाय्य करण्यासाठी अनेक पत्रव्यवहार केले, पण त्याची दखल घेतली नाही, असे याचिकेत म्हटले आहे.

take cognizance of an eye withness of 2611 attack on mumbai bombay HC to government

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com