ठाण्यात सहायक आयुक्तांचा रिक्षाचालकांना दणका; सॅटीसखाली पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी

राहुल क्षीरसागर
Saturday, 17 October 2020

कामात अडथळा आणत महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांना कोपरी नौपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांनी चांगलाच दणका दिला.

ठाणे ः ठाणे रेल्वेस्थाकाबाहेर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची अँटीजेन टेस्ट करण्यात येते; मात्र या कामात अडथळा आणत महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांना कोपरी नौपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांनी चांगलाच दणका दिला. या दणक्‍यानंतर आता, नागरिकांकडून येथील वाहतूक पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

'ती'चा प्रवासाचा आनंद औट घटकेचा! गोंधळाचा फटका, आनंदावर विरजन

ठाणे शहरात रेल्वेने परराज्यातून अथवा इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अँटीजेन टेस्ट करण्यात येत असते. यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉक्‍टरांचे पथक येथे कार्यरत आहे. या पथकात महिला कर्मचाऱ्यांचादेखील समावेश आहे; मात्र या ठिकाणी कार्यरत महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक करणे व कामात अडथळा निर्माण करणे असे प्रकार रिक्षाचालकांकडून करण्यात येत होते. याबाबतच्या तक्रारी कोपरी नौपाडा प्रभाग समिती सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी रेल्वेस्थानकात येत रिक्षाचालकांना दणका दिला; तसेच पुन्हा रिक्षाचालकांची अरेरावी सुरू राहिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारादेखील दिला.

फेक टीआरपी प्रकरण! गुन्हे शाखेकडून विरार येथून एकाला अटक 

या घटनेनंतर सॅटिसखाली असलेली पोलिस चौकी पुन्हा सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे. यापूर्वी सॅटिसखाली नौपाडा पोलिसांची एक चौकी होती. तोपर्यंत बेशिस्त रिक्षाचालकांवर चांगलाच वचक होता. ठाणे महापालिकेने या भागातील गर्दी टाळण्यासाठी स्टेशन परिसर सुटसुटीत राहावा, या उद्देशाने येथील चौकी हटविली होती. ही सॅटिसखालील चौकी सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

 

जर रिक्षाचालकांकडून महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला असल्यास संबंधितांवर कडक कारवाई करीत गुन्हे दाखल करावे. तसेच पूर्वीप्रमाणे पुन्हा सॅटिसखाली वाहतूक पोलिस चौकी सुरू केल्यास गैरप्रकारावर आळा बसण्यासदेखील मदत होईल. 
- मृणाल पेंडसे,
नगरसेविका, ठाणे महापालिका 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Thane the Assistant Commissioner hit the autorickshaw driver