ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो आणखी लांबणीवर; प्रकल्पाचे केवळ चार टक्केच काम पूर्ण...

संजय घारपुरे
Saturday, 1 August 2020

गतवर्षी या मेट्रोचे काम सुरु करण्यात आले होते. त्याच्या कामाची दोन टप्प्यात विभागणी करण्यात आली होती. पहिल्या टप्प्याचे काम 2022 च्या ऑक्टोबरपर्यंत तर दुसऱ्या टप्प्याचे काम 2024 च्या ऑक्टोबरपर्यंत करण्याचे ठरले होते.

मुंबई : मुंबईसह उपनगरांतील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरात मेट्रोचे जाळे विणले जात आहे. सध्या केवळ घाटकोपर ते वर्सोवा ही एकमेव मेट्रो मुंबईत सुरु आहे, तर अन्य मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु आहे. मात्र कामाच्या संथ गतीने अनेक प्रकल्पांना नियोजित वेळेपेक्षा जास्त कालावधी लागत आहे. त्यातच आता कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनचाही परिणाम मेट्रो प्रकल्पांवर झाला.

दुःखद बातमी : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भावाचं निधन

मुंबईशिवाय ठाणे-भिवंडी-कल्याण मार्गावरील मेट्रोची दीर्घकालीन प्रतिक्षा आता आणखी वाढली आहे. ही मेट्रो सुरु होण्यास अजून किमान चार वर्ष लागतील. या मेट्रो पाचचे काम संथगतीने सुरु असल्यामुळे मुंबई महानगर प्रदेस विकास महामंडळाने ही मेट्रो सुरु करण्याची अंतिम मुदत दोन वर्षांनी वाढवली आहे, असे वृत्त एका हिंदी वृत्तसंस्थेने दिले आहे.

जे.जे. रुग्णालयाचे अनोखे संशोधन; विनासंसर्ग होईल रुग्णांची ने-आण...

गतवर्षी या मेट्रोचे काम सुरु करण्यात आले होते. त्याच्या कामाची दोन टप्प्यात विभागणी करण्यात आली होती. पहिल्या टप्प्याचे काम 2022 च्या ऑक्टोबरपर्यंत तर दुसऱ्या टप्प्याचे काम 2024 च्या ऑक्टोबरपर्यंत करण्याचे ठरले होते. या प्रकल्पाचचे आतापर्यंत केवळ चार टक्केच काम झाले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होण्याची मुदत 2022 च्या ऑक्टोबरवरुन 2024 च्या डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. 
ठाणे - भिवंडी - कल्याण मेट्रो मार्ग 24.9 किलोमीटरचा आहे. त्यातील ठाणे ते भिवंडी मार्गावर काम सुरु झाले आहे. कामाचा स्वतंत्र आढावा घेतल्यास मेट्रो स्थानकांचे काम 3 टक्के, एलिवेटेड पूलाचे काम 5.2 टक्के तर एकूण प्रकल्पाच्या कामापैकी 4 टक्के काम पूर्ण झाले आहे. आता ही मेट्रो पूर्ण एलिवेटेड आहे. ठाणे ते भिवंडी दरम्यान ही मेट्रो एकंदर 490 खांबावरुन धावणार आहे. त्यापैकी केवळ 33 खांब तयार झाले आहेत, म्हणजेच 459 खांबांचे काम बाकी आहे.
 
5 हजार खाटांच्या महारुग्णालयाची तयारी सुरू; पालिकेने जमिनीसाठी मागितले अर्ज

मुंबई महानगर विकास महामंडळाचे मुंबईतील अनेक प्रकल्प कामगार गावाला गेल्याने रखडले आहेत. आश्चर्य म्हणजे या प्रकल्पावरील कामगार काम करीत आहेत मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात 236 कामगार काम करीत होते, तर जून, जुलैमध्ये 233. तरीही कामास गती आलेली नाही. या प्रकल्पावर एकंदर 8 हजार 416 कोटी 50 लाख खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर कापूरबावडी, बाळकुम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूर फाटा, धामणकर नाका, भिवंडी, गोपाल नगर, टेमघर, रानौली गाव, गोवे गाव, एमआयडीसी, कोन गाव, दुर्गाडी किल्ला, सहजानंद चौक आणि कल्याण रेल्वे स्टेशन ही स्थानके प्रस्तावीत आहेत.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane-Bhiwandi-Kalyan metro project will delay more as only 4 percent work complete