कोरोना रुग्णालयासाठी 'या' महापालिकेकडून नगरसेवक निधीला कात्री?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

शहरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, शहरात आता ग्लोबल इन्पॅक्ट हबच्या ठिकाणी एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचा पालिकेचा मानस आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेने शहरात एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याची तयारी केली आहे. सध्या महापालिकेचे उत्पन्न स्त्रोत बंद असल्याने या कामासाठी नगरसेवक निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, मात्र या प्रस्तावाला भाजपच्या नगरसेवकांकडून विरोध होत आहे. 

हे ही वाचा : प्रशासनाला सुनावलं, क्वारंटाईन करण्याबद्दल मुंबई हायकोर्ट म्हणतंय...  

शहरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता, शहरात आता ग्लोबल इन्पॅक्ट हबच्या ठिकाणी एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. या संदर्भात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन हे रुग्णालय लवकरात लवकर उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रुग्णालय उभारण्यासाठी पालिकेने नगरसेवक निधीतून प्रत्येकी पाच लाख या कामासाठी देण्यात यावेत, अशी सूचना केली आहे. त्यानुसार प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांनी नगरसेवकांशी चर्चा करुन हा निधी द्यायचा आहे. ठाण्यात एकूण 131 नगरसेवक असून त्यांच्या निधीतून सुमारे साडेसहा कोटी रुपये जमा होणार आहेत.

महत्वाची बातमी : यंदा पावसाळ्यात मुंबईकरांना कोरोनासोबत 'या' परिस्थितीचा देखील करावा लागणार सामना?

या संदर्भात भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पालिका आयुक्तांना पत्र देऊन नगरसेवक निधी पेक्षा आपला दवाखान्यासाठी ठेवलेला सुमारे 150 कोटींचा निधी ठेवण्यात आला आहे, तोच या रुग्णालयासाठी देण्यात यावा, अशी सूचना केली आहे. महापालिकेची आपला दवाखाना ही संकल्पना अद्याप पुरेशी सुरु झालेले नाही. सुरू झालेल्या आपला दवाखान्यात साहित्य, डॉक्टरची कमतरता आहे. त्यामुळे हा निधी वाया जाण्यापेक्षा तो या रुग्णालयासाठी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सत्ताधारी शिवसेना या कोविडच्या रुग्णालयासाठी आग्रही असताना भाजपाच्या नगरसेवकांनी नगरसेवक निधीला विरोध केल्यास महापालिका प्रशासनाला इतर माध्यमातून निधी जमवावा लागणार आहे.

मोठी बातमी : ...नाहीतर येत्या काळात त्या खासगी डॉक्टर्सचे परवाने होणार रद्द !

भाजपच्या भूमिकेमुळे निधीबाबत सांशकता
निधी देण्याबाबत भाजप नगसेवकांच्या चर्चेत अनेक नगरसेवकांनी हा निधी देण्यास विरोध केला असल्याचे समजते. रुग्णालय उभारण्यास आमचा विरोध नाही, किंवा निधी देण्यासही आमचा विरोध नाही, मात्र नगरसेवक निधीतून केवळ साडेसहा कोटी जमा होऊ शकतात. उर्वरीत निधीचे काय करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या निधीतून कितपत रक्कम जमा होईल, याबाबत सांशकता आहे.

Thane Municipal Corporation proposes to take Rs. 5 lakh each


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane Municipal Corporation proposes to take Rs. 5 lakh each