ठाण्यातील वाहतूक कोंडी फुटणार; वाहतूक वेगवान करण्याचे MMRDAचे लक्ष्य |Thane news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic-Jam

ठाण्यातील वाहतूक कोंडी फुटणार; वाहतूक वेगवान करण्याचे MMRDAचे लक्ष्य

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते वाहतूक जलद करण्याचे उद्दिष्ट मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ठेवले आहे. त्यानुसार ठाण्यातील वाहतूक कोंडी (thane traffic jam) फोडण्यासाठी बाळकूम ते गायमुख ठाणे कोस्टल रोड, कल्याण बायपास रस्ता (Kalyan bypass road) (भाग ३) - मोठागाव पूल ते गोविंदवाडी बायपास आणि आनंद नगर ते साकेत दरम्यान उन्नत रस्ता बांधण्यात (Road construction) येणार आहे. या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या १९५ नव्या रुग्णांची भर; एकाचा मृत्यू

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५१ व्या प्राधिकरणाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेसह उर्वरित पायाभूत सेवा सुविधा निर्माण करण्यासाठी विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण शहरांदरम्यानचा प्रवास वेगवान करण्यासाठी या बैठकीत निर्णय घेण्यात आले. ठाणे येथील घोडबंदर मार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बाळकूम ते गायमुख हा ठाणे कोस्टल रोड तयार करण्यासाठी १ हजार ३१६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली ते थेट टिटवाळापर्यंत कल्याण बायपास या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील तिसऱ्या टप्यात मोठागाव पूल ते गोविंदवाडी बायपास या रस्त्याच्या बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. या मार्गामुळे मुंबई, ठाणे किंवा नाशिकहून कल्याण-डोंबिवलीकडे ये-जा करण्यासाठी शिळफाटा किंवा कोन गावामार्गे दुर्गाडी पूल असा वळसा घ्यावा लागतो. तिसऱ्या टप्प्यातील हे काम पूर्ण झाल्यास वाहनचालकांच्या प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील आनंद नगर ते साकेत दरम्यान ६.३० किमी लांबीचा उन्नत रस्ता बांधण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. हे प्रकल्प येत्या काही वर्षांत पूर्णत्वास गेल्यास ठाणे, कल्याण, मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होणार असून प्रवासाचा वेळही वाचणार आहे.

एमएमआर क्षेत्राचा विकास होणार

एमएमआरडीएने हाती घेतलेल्या प्रकल्पांमुळे एमएमआर क्षेत्राचा आणखी विकास होणार आहे. बायपास मार्गांमुळे वाहतूक जलद गतीने होण्यास मदत होईल आणि ठाण्यातील अंतर्गत रस्त्यावरील गर्दी कमी होईल.
- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री.

loading image
go to top