ठाणे पोलिस झाले 'ज्येष्ठ दक्ष'

दीपक शेलार
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

ठाण्यात एकट्या-दुकट्या ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालण्यासह ज्येष्ठ महिलांच्या सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी ठाणे पोलिस "ज्येष्ठ दक्ष' बनले आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांना अपप्रवृत्तीपासून सावध राहून काळजी घेण्याचे आवाहन आणि जनजागृती पोलिसांमार्फत करण्यात येत आहे. नौपाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी नुकताच कचराळी तलाव परिसरात जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत जनजागृती मोहीम राबविली. 

ठाणे : ठाण्यात एकट्या-दुकट्या ज्येष्ठ नागरिकांना गंडा घालण्यासह ज्येष्ठ महिलांच्या सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी ठाणे पोलिस "ज्येष्ठ दक्ष' बनले आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधत त्यांना अपप्रवृत्तीपासून सावध राहून काळजी घेण्याचे आवाहन आणि जनजागृती पोलिसांमार्फत करण्यात येत आहे. नौपाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी नुकताच कचराळी तलाव परिसरात जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत जनजागृती मोहीम राबविली. 

27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी दोन महिन्यांचा अवधी

ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात मागील काही काळापासून ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याचे, तसेच वृद्ध महिलांच्या सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय भामटे बतावणी करून घरात शिरून मुद्देमाल लांबवत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. पोलिसांची गस्त वाढवूनही गुन्हे घडत असल्याने पोलिसांनीच "ज्येष्ठ दक्ष' बनण्याचे ठरवले. त्यानुसार ठाणे पालिका मुख्यालयासमोर असलेल्या कचराळी तलाव परिसरात दररोज फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम पोलिसांनी सुरू केला आहे. 

ठाणे पालिकेत सत्ताधारी-प्रशासन आमने-सामने

ज्येष्ठ नागरिकांनी आपले सोन्याचे दागिने कपाटात किंवा कपड्यामध्ये न ठेवता सुरक्षित अशा लॉकरमध्ये ठेवावेत. कुणाही अनोळखी व्यक्तीला घरात प्रवेश देऊ नये. कुरिअर, केबल किंवा बॅंकेची तत्सम कामांचा बहाणा करून येणाऱ्यांची खात्री पटल्याशिवाय विश्वास ठेऊ नये, अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून, पोलिस तुमच्या रक्षणासाठी असून तुम्ही मदत मागितल्यास ती तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, असा पोलिसांच्या प्रती विश्वास निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. 

ज्येष्ठ नागरिकांना एकटे पाहून त्यांना फसविण्याचे प्रकार ठाण्यात वाढले होते. गुन्हेगारांवर वचक बसावा, यासाठी पोलिस सतर्क आहेतच; किंबहुना ज्येष्ठांचेच प्रबोधन केल्याने गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. याबरोबरच एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना काही वैद्यकीय मदत किंवा औषधे यांची गरज भासल्यास त्यांनी पोलिसांनी दिलेल्या हेल्पलाईन आणि दूरध्वनीवर संपर्क साधावा. पोलिस त्यांची गरज आणि आवश्‍यकता पूर्ण करतील, अशी व्यवस्था केली आहे. 
- अनिल मांगले 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, 
नौपाडा पोलिस ठाणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane police become 'senior alert'