ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना कोरोना, मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल

दिपक शेलार
Monday, 7 September 2020

ठाण्यात आतापर्यंत 130 अधिकाऱ्यांसह एक हजार 313 पोलिस कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 112 अधिकारी व एक हजार 63 कर्मचारी असे एकूण एक हजार 175 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून 17 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला; तर दोन पोलिस कोव्हिडसदृश आजाराने दगावले आहेत.

ठाणे : टाळेबंदीच्या काळात शहर पोलिस दलातील कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या कर्मचाऱ्यांची जातीने काळजी घेणाऱ्या ठाणे पोलिस आयुक्तांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारांसाठी मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. आपल्या पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुटुंबियांप्रमाणे काळजी घेणाऱ्या ठाणे पोलिस आयुक्तांनाच कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.

नक्की वाचा : मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढीचा भडका; BMC ने दिले 'हे' कारण

रविवारी रात्री त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. आयुक्तांच्या कार्यालयातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील चौघांनी कोरोनावर मात केली; तर पोलिस मुख्यालयात एका अधिकाऱ्यासह 197 जण बाधित झाले होते. त्यातील 174 जणांना रुग्णालयांतून सोडण्यात आले आहे. रविवारी एकाच दिवशी विशेष शाखेतील एक उपनिरीक्षक व डायघर, वागळे इस्टेट, राबोडी, खडकपाडा पोलिस ठाण्याचे प्रत्येकी एक आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्यातील दोघा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. 

हे ही वाचा : 'मेहनतीतून कमावलेलं माझं ऑफिस BMC तोडणार'; ऑफिसमध्ये जबरजस्ती अधिकारी घुसल्याचा कंगनाचा आरोप

दरम्यान, ठाण्यात आतापर्यंत 130 अधिकाऱ्यांसह एक हजार 313 पोलिस कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 112 अधिकारी व एक हजार 63 कर्मचारी असे एकूण एक हजार 175 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून 17 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला; तर दोन पोलिस कोव्हिडसदृश आजाराने दगावले आहेत. सध्यस्थितीत 18 अधिकारी व 100 पोलिस कर्मचारी अशा 118 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

(संपादन : वैभव गाटे)

thane Police Commissioner corona positive read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane Police Commissioner corona positive read full story