
दिल्ली-जेएनपीटी हायवे झाल्यास ठाण्याची वाहतूक कोंडीतून सुटका - नितीन गडकरी
डोंबिवली : लॉजिस्टिक कॉस्ट ही सर्वात मोठी समस्या आपल्यासमोर असून ती कमी करण्यासाठी रस्ते, रेल्वे, हवाई आणि जल वाहतूकीत अमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कामे सुरु असून दिल्ली-जेएनपीटी हायवे (Delhi-JNPT highway) झाल्यास दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या 12 तासात पार करता येणार आहे. शहराच्या अंतर्गत होणारी अवजड वाहनांची वाहतूक शहराच्या बाहेरुन मार्गस्थ झाल्याने ठाणे, कल्याण डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून (thane traffic issue) सुटका होईल व ठाण्यातील प्रदुषण देखील कमी होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केला.
हेही वाचा: मुंबई : लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, ठाणे-दिवानंतर आता कुर्ला-परळकडे लक्ष
कल्याण सुभेदार वाडा कट्ट्याच्या वतीने प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प रस्ते, वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑनलाईन दृकश्राव्याच्या माध्यमातून गुंफले. यावेळी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष रामभााऊ पातकर, आनंद कापसे, वरुण पाटील, पाठक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी श्रोत्यांशी संवाद साधताना सुखी, समृद्ध, शक्तीशाली संपन्न भारत असे स्वप्न साकारयचे असेल तर शेती आणि उद्योग अधिक विकसित करण्याची गरज आहे. त्यासाठी पाणी, इंधन, वाहतूकीची साधणे आणि संवाद यात नवनवे प्रयोग साधावे लागतील. जलमार्ग हा सर्वात स्वस्त वाहतूकीचा मार्ग आहे. रस्त्यासाठी 10 रुपये, रेल्वेसाठी 6 रुपये खर्च येत असेल तर जलवाहतूकीसाठी केवळ 1 रुपया खर्च येतो. जलमार्ग सुधारले तर इंधनाची बचत होईल वाहतूकही वाढेल. त्यामुळे 102 जलमार्ग विकसित करण्याचे काम सध्या सुरु आहे. ग्रीन इंधन तयार करण्यावर भर दिला जात आहे.
हेही वाचा: आकाशवाणीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून; सकाळच्या सभेत बदल
इथेनॉल हे डिझेलपेक्षा स्वस्त असून त्यामुळे दोन लाख कोटींची इकॉनॉमी वाढणार आहे. बायो एलएनजी व बायो सीएनजी ही गॅस इकॉनॉमी देशात विकसित करण्यात येत असून त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. सीएनजीवर चालणारी वाहने तयार करण्यासाठी आज विविध कंपन्या पुढे येत आहेत. त्याचबरोबर विंड, हायड्रो पॉवरला चालना दिली जात आहे. ग्रीन हायड्रोजेन वापर करण्यासाठी कच:यातून निर्माण होणा:या मिथेन वायूपासून ग्रीन हायड्रोजनचा वापर करता येऊ शकतो.
इलेक्ट्रिसिटीवर मोठ्या प्रमाणात काम होत आहे. इंधन बचत आणि प्रदुषण कमी करण्यासाठी ई वाहनांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. ई हायवे आणि ग्रीन हायवे तयार केली जातील. देशात 22 ठिकाणी ग्रीन हायवे असतील. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन वेळेची बचत होईल. तसेच लॉजीस्टीकवर होणारा खर्चाची बचत होण्यास मदत होईल. सीप्लेन, एअर स्ट्रिप, हॅलीपॅड यांचा विचार केला जात आहे. ठाणे, कल्याण या शहरांना खाडी किनारा लाभला आहे, तलाव या शहरांत आहेत त्याचा वापर करता येईल का याविषयी अभ्यास सुरु आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे. स्वदेशी व स्वावलंबन आधारे आपल्या देशातच इंधन, वाहने तयार करुन अर्थव्यवस्था मजबूतीकरणावर भर दिला जात असल्याचे सांगत विविध योजना गडकरी यांनी जनतेसमोर मांडल्या.
नागपूरच्या धर्तीवर रोड, त्याच्यावर ब्रीज, त्यावर मेट्रो असे ठाणे येथे बांधता आले असते. त्यामुळे वेस्टर्न बायपास इस्टर्न बायपासची कॅपॅसिटी डबल झाली असती असे तेव्हा मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हणालो होतो, त्यावर देवेंद्र म्हणाले की, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण ते राहून गेले ही बाब गडकरी यांनी यावेळी नमूद केली.
कृतीशील कल्पना केवळ मांडून चालत नाही त्या प्रत्यक्षात आणल्या पाहीजे. स्वप्न दाखवणारे नेते लोकांना आवडतात पण ती स्वप्न पूर्ण केली नाही की लोकं नाकारतात देखील. जे दाखवलेली स्वप्न पूर्ण करतात त्यांना लोकं लक्षात ठेवतात. ही स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही पार पाडू.
Web Title: Thane Traffic Problem Wil Be Solved If Delhi And Jnpt Highway Gets Done Says Nitin Gadkari
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..