ठाणे परिवहनचे टायर पंक्चरच, पाहणी दौऱ्यात 227 हून अधिक बसेस धूळ खात

राजेश मोरे
Sunday, 29 November 2020

परिवहनच्या ताफ्यात असलेल्या 227 हून अधिक बसेस छोट्या मोठ्या दुरुस्तीसाठी मागील पाच ते सात वर्षापासून धूळ खात पडून असल्याची गंभीर बाब परिवहन समिती सदस्यांच्या पाहणी दौऱ्यात पुन्हा एकदा उघड झाली. 

ठाणे: परिवहनच्या ताफ्यात असलेल्या 227 हून अधिक बसेस छोट्या मोठ्या दुरुस्तीसाठी मागील पाच ते सात वर्षापासून धूळ खात पडून असल्याची गंभीर बाब परिवहन समिती सदस्यांच्या पाहणी दौऱ्यात पुन्हा एकदा उघड झाली. 

विशेष म्हणजे एक नवी कोरी बस केवळ नटबोल्ट नसल्याने दुरुस्तीसाठी पडून असल्याचेही दिसून आले. दुरुस्ती का होत नाही, निधीची कमतरता का आहे, भंगार झालेले स्पेअरपार्ट का विकले जात नाही याच्यासह रस्त्यावर परिवहनच्या ताफ्यातील बसेस का निघत नाहीत? याचा अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती तथा परिवहन समितीचे पदसिध्द सदस्य संजय भोईर यांनी परिवहन प्रशासनाला दिले.

संजय भोईर यांच्यासह परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांच्यासह सदस्यांनी वागळे आगार डेपोचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यात परिवहन कर्मचाऱ्यांचा काय काय अडचणी आहेत, कोणत्या समस्या आहेत, याची माहिती त्यांनी यावेळी घेतली. मात्र या पाहणी दौऱ्यात बसेसला टायर नसणो, हॉर्न नसणो, किरकोळ स्पेअरपार्ट नसणो, काचा तुटलेली, नटबोल्ट नसणो आदींसह इतर किरकोळ दुरुस्तीसह मोठय़ा दुरुस्तीसाठी तब्बल २२७ हून अधिक बसेस धुळ खात पडल्याची गंभीर बाब यावेळी निदर्शनास आली आहे.

अधिक वाचा-  मुंबईत विनामास्क प्रवाशांवर लोहमार्ग पोलिसांकडून कठोर कारवाई

विशेष म्हणजे एक नवी कोरी बस येथे पाहण्यात आली असून तिला नटबोल्ट मिळाला नसल्याने ती देखील धुख खात पडली असल्याचे या पाहणीत दिसून आले आहे. बसेसची दुरुस्ती का होत नाही, असा सवाल भोईर यांनी उपस्थित केला असता, दुरुस्तीसाठी निधीच मिळत नसल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच दुरुस्तीची यादी देऊनही आम्हाला अद्यापही साहित्य उपलब्ध झालेले नसल्याचेही यावेळी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

परिवहनच्या ताफ्यात ठेकेदाराच्या बसेस सोडल्या तर 277 बसेस सध्या आहेत. मात्र त्यातील अवघ्या 45 ते 50 बसेस रोज रस्त्यावर धावत असून त्यातून अवघे 75 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. त्यातही मेजर दुरुस्तीच्या 50 बसेस असून एका बसेसच्या दुरुस्तीचा खर्च हा 10 लाखांच्या आसपास आहे. मीडियम दुरुस्तीच्या बसेससाठी 5 ते 6 लाखांचा खर्च आहे. त्यातही ज्या बसेस मधून परिवहनला अधिकचे उत्पन्न मिळत होते. त्यात 30 एसी बसेसपैकी अवघ्या 9 बसेस रस्त्यावर धावत असून त्यातही पालिकेकडून दरमहिना परिवहनला ११ कोटी दिले जात आहेत.

अधिक वाचा-  हान मुलांवर लक्ष ठेवा, चार वर्षांच्या चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू

त्यातील 8 कोटींच्या आसपास खर्च हा पगारावर जात आहे. उर्वरीत खर्च डिझेल आणि सीएनजीसाठी जात आहे. या कंपन्यांनी देखील आधी पैसे द्या मगच डिझेल आणि सीएनजी मिळेल अशी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवताना परिवहनला तारेवरची कसरत करावी लागत असल्याची गंभीर बाब या पाहणी दौऱ्यात निदर्शनास आली आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Thane Transport 227 buses closed for five to seven years


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane Transport 227 buses closed for five to seven years