ठाणेकर अनुभवताहेत वैशाख वणवा

ठाण्यात उष्मा वाढला
ठाण्यात उष्मा वाढला
Updated on

ठाणे : यंदा अवकाळी पावसानंतर थंडीच्या मोसमातदेखील हिवाळी पाऊस बरसला होता. अन्‌, आता तर थंडीचा मोसम सुरू असतानाच उष्मा वाढू लागल्याने उष्म्याच्या काहिलीने नागरिक हैराण झाले आहेत. किंबहुना, फेब्रुवारी महिन्यातच "ऑक्‍टोबर हिट'ची अनुभूती ठाणेकर घेत आहेत. गेले काही दिवस उन्हाचा पारा चढताच राहिला असून सोमवारी कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचल्यामुळे वातावरणात उन्हाचा पारा वाढल्याचे जाणवत होते. तापमानाची पातळी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिक घामाघूम होत आहेत. दरम्यान, उष्मा वाढल्याने विजेचा वापरदेखील वाढला आहे. 

वाढत्या नागरीकरणाबरोबरच ठाण्यात अनेक प्राकृतिक बदल होत आहेत. "टॉवर संस्कृती'मुळे उंचच उंच इमारती उभ्या राहत असल्याने किंबहुना मेट्रो व इतर विकासप्रकल्प सुरू असल्याने ठाणे शहरातील नैसर्गिक संपदा लोप पावत आहे.

शहरातील बहुतांश रस्ते सिमेंट-कॉंक्रीटचे बनल्याने मातीशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करतात. गेल्या आठवड्याभरात उन्हाचा पारा 35 ते 37 अंश सेल्सियसच्या वर पोहचल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडे नोंदवण्यात आली आहे. 

उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांच्या वेळादेखील बदलल्या आहेत. दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने या कालावधीत रस्त्यावरील वर्दळ रोडावलेली असते. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक टोप्या, मोठे रुमाल, स्कार्फ व गॉगल वापरत आहेत.

महिलावर्ग तोंडाला स्कार्फ लावून अथवा हातात छत्री घेऊन मार्गक्रमण करीत असल्याचे चित्र दिसत आहे. तापमानाचा हा आलेख कमाल (दिवसातील सर्वाधिक) व किमान (सर्वात कमी) असा नोंदवला जातो. सोमवारी 24 फेब्रुवारीला सर्वाधिक म्हणजेच कमाल तापमान 37.07 अंश सेल्सियस इतकी नोंद झाल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली. 

हवामान बदलांचे परिणाम 
यंदा पाऊस अनियमित पडल्याने वातावरणात देखील झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. मध्यंतरी थंडीच्या मोसमात पडलेल्या रिमझिम पावसामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले. त्यामुळे डिसेंबर अखेरीस तसेच, जानेवारी महिन्यात सुरू झालेला थंडीचा मोसम हळूहळू बदलू लागला आहे. रात्री थंडावा तर दिवसा कडक उन्हाच्या झळा बसू लागल्याने तापमानातील हे बदल आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. आगामी काळात उन्हाचा पारा चढताच राहणार असल्याचे मत हवामान तज्ज्ञ व्यक्त करतात. 

सध्या दुपारच्या सुमारास तापमानात वाढ होत असल्याने सनस्ट्रोक,डिहायड्रेशन किंवा त्वचेचे विकार जडू शकतात.तेव्हा,शक्यतो बाहेर जाणे टाळावे.किंबहुना,उन्हात फिरताना छत्री किंवा डोक्यात टोपी घालावी.पौष्टिक व पाचक आहारासोबतच भरपूर पाणी प्यावे,जलजन्य पदार्थ म्हणजेच ताक अथवा उसाचा रस,लिंबू सरबत सतत पीत राहावे.उन्हामुळे त्रास जाणवल्यास किंवा आजराची लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- डॉ.कैलास पवार
जिल्हा शल्यचिकित्सक,ठाणे  

तापमान तक्ता (अंश सेल्सियसमध्ये) 
                  किमान  कमाल 
21 फेब्रुवारी  23.01   35.09 
22 फेब्रुवारी  22.02   37.07 
23 फेब्रुवारी  23.06   37.02 
24 फेब्रुवारी  23.02   37.04 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com