esakal | कोरोनाचा असाही फटका; 30 वर्षानंतर प्रथमच ठाण्यातील सर्वात मोठी स्पर्धा रद्द.. 
sakal

बोलून बातमी शोधा

thane marathon

पावसाळ्यास सुरुवात होताच धावपटू, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना वेध लागतात ते ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे. राज्यासह ठाणे शहरातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने यावर्षी ही स्पर्धा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी 'सकाळ'ला दिली.

कोरोनाचा असाही फटका; 30 वर्षानंतर प्रथमच ठाण्यातील सर्वात मोठी स्पर्धा रद्द.. 

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

ठाणे : पावसाळ्यास सुरुवात होताच धावपटू, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना वेध लागतात ते ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे. राज्यासह ठाणे शहरातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने यावर्षी ही स्पर्धा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी 'सकाळ'ला दिली. त्यामुळे गत 30 वर्षानंतर प्रथमच महापौर मॅरेथॉन स्पर्धेत खंड पडणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारे विद्यार्थी, खेळाडूंचा या निर्णयामुळे हिरमोड होणार असला तरी सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि ओढावलेली परिस्थिती पाहता ही स्पर्धा रद्द करणेच उचित असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. 

देशातील रेल्वेची नियमित वाहतूक 12 ऑगस्टपर्यंत बंद? सोशल मीडियावर जोरदार चर्चा...

ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा अॅथेलॅटिक्स संघटना यांच्यावतीने दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात राज्यस्तरीय ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे स्पर्धेचे 31 वे वर्ष आहे. क्रिडा क्षेत्रातील सर्वांचेच या स्पर्धेकडे लक्ष लागून राहीलेले असते. खासकरुन सैनिकी स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असलेले खेळाडू या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होतात. खेळाडूंसाठी महत्त्वाची असलेली ही स्पर्धा रस्त्यांवरील खड्डे, प्रायोजकांकडून मिळणाऱ्या रक्कमेची उधळपट्टी, भर रस्त्यात टाकले जाणारे व्यासपीठ आदी कारणांमुळे कायम वादाचा विषय ठरलेली आहे. 

कोरोनाकाळातील कामगिरीचा परिणाम, नवी मुंबई आयुक्तांच्या बदलीचा निर्णय स्थगित

त्यातच 2017 साली तत्कालीन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी स्पर्धेसाठी प्रायोजक शोधायला नकार दिला होता. तत्कालीन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रायोजकत्वाचा भार झेलल्याने ही स्पर्धा पार पडली. मागीलवर्षी 2019 ला राज्यात पूरपरिस्थिती ओढावल्यामुळे मॅरेथॉनवर अमाप खर्च करण्यापेक्षा तो निधी पूरग्रस्तांना मदतीसाठी देऊन स्पर्धा रद्द करण्याची मागणी केली जात होती. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असल्याने स्पर्धा रद्द करता येणार नाही, असे सत्ताधारी शिवसेनेने स्पष्ट करीत स्पर्धा पूर्ण केली होती. कायम वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतरही सर्व अडथळ्यांवर मात करीत ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आत्तापर्यंत पार पडली आहे. यावर्षी मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याने ही स्पर्धा रद्द करण्याशिवाय पालिका प्रशासनाकडे दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. यामुळे गेल्या 30 वर्षाच्या परंपरेत यंदा प्रथमच खंड पडणार आहे. 

पर्यटकांना आता समुद्रकिनारी मिळणार चौपाटी कुटीचा आनंद; राज्यात 'या' किनाऱ्यावर मिळणार सुविधा...

राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गणेशोत्सवावरही काही निर्बंध घालण्यात आले आहेत. दहिहंडी उत्सव समन्वय समितीनेही दहिहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत राज्यातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मॅरेथॉन स्पर्धेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे शक्य होणार नाही. यामुळे ही स्पर्धा रद्द केली जाईल अशी माहिती प्रशासनाच्यावतीने 'सकाळ'ला देण्यात आली. याविषयी अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतू लवकरच त्याविषयी अधिकृत घोषणा केली जाईल असेही प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. 

मुंबईत कंटेन्मेंट झोनची संख्या वाढली; तब्बल 'इतक्या' इमारती केल्यात सील...

राज्यासह ठाणे शहरातही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होणेही आवश्यक आहे. सर्व परिस्थितीचा आढावा घेता यंदा ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धाही रद्द करण्यात येईल. 
- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे महानगरपालिका

loading image
go to top