...म्‍हणूनच महिला उतरल्‍या रस्‍त्‍यावर!

...म्‍हणूनच महिला उतरल्‍या रस्‍त्‍यावर!

पनवेल : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एम जलवाहिनी दुरुस्तीचे नियोजन चुकल्याने सलग तिसऱ्या दिवशी पालिका हद्दीतील सिडको वसाहतींना होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पाणीकपातीबद्दल अनेकांना माहितीच नसल्याने आयत्या वेळी हंडाभर पाण्यासाठी महिलांसह बच्चे कंपनीलाही धावाधाव करावी लागली. 

भोकरपाडा जलशुद्धी केंद्रातून पनवेल पालिका हद्दीतील सिडको वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी वापरात असलेल्या जलवाहिन्या जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. जलवाहिन्यांना जागोजागी गळती लागली आहे. शनिवारीदेखील पोदी, आसूडगाव आदी १५ ते २० ठिकाणी जलवाहिन्या दुरुस्त करण्यासाठी एमजेपीकडून ३६ तासांचे शटडाऊन घेण्यात आले होते.

या निर्णयामुळे पालिका हद्दीतील नवीन पनवेल, खांदेश्वर, मोठा खांदा गाव, कळंबोली; तसेच करंजाडे ग्रामपंचायत हद्दीतील वसाहतीमधील पाणीपुरवठा ३६ तासांकरिता बंद ठेवण्यात आला होता; मात्र एमजेपीचे दुरुस्तीचे नियोजन चुकल्याने दुरुस्तीसाठी ३६ तासांऐवजी ४२ तासांचा कालावधी लागल्याने वसाहतीतील नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल झाले. एमजेपीचे अधिकारी के.बी. पाटील यांनी दिलेल्‍या माहितीनुसार १५ ते २० ठिकाणी दुरुस्‍ती करण्यात आली असून बुधवारी सायंकाळी पाणीपुरवठा पुर्ववत झाल्‍याचे सांगण्यात आले.  

पाणीकपातीबाबत नागरिक अनभिज्ञ
दुरुस्तीकरिता दोन दिवस पाणी बंद ठेवण्यात येणार असल्याची दवंडी रिक्षाद्वारे देण्यात आली होती; मात्र अनेकांपर्यंत ही दवंडी पोहोचली नाही. त्यामुळे पाणीकपातीची कल्पना नसलेल्या गृहिणींनी घरामध्ये पाण्याचा अतिरिक्त साठा जमा न केल्याने अनेकांची दैनंदिन कामे खोळंबली होती.

खासगी टॅंकर मालक नफ्यात
प्रत्येक वसाहतीला पाणीपुरवठा करण्यासाठी सिडकोने बांधलेल्या जलकुंभातील पाणीदेखील संपल्याने सिडकोमार्फत टॅंकरद्वारे पुरवण्यात येणारे पाणीदेखील बंद झाले. त्यामुळे खासगी टॅंकरचालकांची चांगलाच नफा कमावला. पालिकेचे टॅंकर धोरण ठरलेले असतानादेखील टॅंकरचालकांकडून कुठे १६००; तर कुठे २२०० रुपयांपर्यंत दर आकारले जात होते.

पालिकेविरोधात संताप 
वसाहतीला पाणी पुरवण्याची जबाबदारी सिडकोची असल्याने पालिका पाणीपुरवठ्याबाबत वसाहतींना कोणतीही मदत करू शकत नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अडचणीच्या काळात पालिका प्रशासनाने सहकार्य करण्यास विरोध केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. आणीबाणीच्या काळात पालिका हद्दीतील नागरिकांना प्रशासन पाणी पुरवू शकत नसेल तर आम्ही पालिकेसाठी मतदानच का करावे, असा सवाल काही नागरिकांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सतीश पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत द. ग. तटकरे हायस्कूलमधील बोअरचे पाणी नागरिकांसाठी खुले करून दिले होते. पाटील यांच्या शाळेतील बोअरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

आणीबाणीच्या काळात नागरिकांना पाणी पुरवण्याची जबाबदारी पालिकेने पार पाडणे आवश्‍यक होते; मात्र हे होऊ शकले नाही, ही खंत आहे. 
- सतीश पाटील, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

पाणीपुरवठा बंद राहिल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अशा वेळी सिडको वसाहतीमधील नागरिकांना पालिकेतर्फे पाणीपुरवठा व्हावा, याकरिता पाठपुरावा करणार आहे.
- ॲड. मनोज भुजबळ, नगरसेवक. भाजप 

गुरुवारी पाणीपुरवठा सुरू होणार असला तरी होणारा पुरवठा कमी दाबाने होणार असल्याने सिडकोचे जलकुंभ न भरता नागरिकांना अगोदर पाणी पुरवण्यात 
येणार आहे.
- गणेश चंदनकर, अधिकारी, सिडको पाणीपुरवठा

मागील ३ दिवसांपासून सेक्‍टर- २, ३ मध्ये पाणी आले नाही. पिण्याचे पाणी सोडले तर इतर गोष्टींसाठी पाणी नसल्यामुळे मागील दोन्ही दिवस घरात जेवण बनवणे, भांडी, कपडे इत्यादी कामे करणे अशक्‍य झाले आहे. नवीन पनवेल येथे पाण्याची समस्या अनेकदा येऊनसुद्धा दरवेळी डागडुजीचे कारण देऊन लोकांना ताटकळत ठेवण्यात येत आहे. पनवेलमधील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी जास्त पाणी लागणारच आहे. प्रशासनाने पाण्याच्या प्रश्‍नावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. 
- उमा सावंत, रहिवासी, नवीन पनवेल 

आज तिसरा दिवस आहे. घरी पाणी येत नाही. पिण्याचे पाणी विकत घेता येते; परंतु कपडे, भांडी आदी कामांची गैरसोय होत आहे. त्यासाठीही बाहेरून पाणी उपलब्ध होत नाही. मुलांना हातपाय धुऊन शाळेत पाठवण्याची वेळ आली आहे.
- मंदाकिनी जाधव, गृहिणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com