मुंबईकर...! आजपासून सुरु होणार 'या' गोष्टी, पण जाणून घ्या नियम

मुंबईकर...! आजपासून सुरु होणार 'या' गोष्टी, पण जाणून घ्या नियम


मुंबई- सध्या महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. त्यातच राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन या धोरणानुसार आजपासून राज्यात अनलॉकडाऊन 1.0 ला सुरुवात झाली आहे. पहिल्या पासून रेड असल्यामुळे मुंबई शहरात अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे दोन महिन्यांपासून काही गोष्टी मुंबईत आजपासून सुरु करण्यात येणार आहेत. आता मुंबई शहर आणि शेजारच्या महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत प्रवासासाठी परवानगीची अट काढून टाकण्यात आली आहे.  त्यामुळे 'मुंबई एमएमआर' परिसरात सर्वसामान्यांना विनाअडथळा प्रवास करता येणं शक्य होईल. तसंच बाजारपेठा, दुकानं सुरु होणार असली तरी पूर्वीसारखी गर्दी करता येणार नाही. काही गोष्टींचं नागरिकांना पालन करावे लागणार आहे. 

मुंबई शहर आणि शेजारच्या महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत प्रवासासाठी परवानगीची अट काढून घेण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईँदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ येथे नागरिकांना आता परवानगीशिवाय प्रवास करता येईल.

राज्य सरकारकडून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 3जूनपासून 'मिशन बिगिन अगेन' सुरू करण्याचे जाहीर केलं होतं. मात्र, मुंबईवर निसर्ग चक्रीवादळाचं सावट असल्यानं सरकारनं नागरिकांना दोन दिवस घरीच थांबण्याचं आवाहन केलं होतं.
दरम्यान आता चक्रीवादळाचे संकट टळल्यानं आजपासून लोकांना घराबाहेर पडता येणारेय. 

पहाटे पाच ते रात्री सात वाजेपर्यंत लोकांसाठी मैदाने, खुली, उद्याने खुली करण्यात आली आहे. जॉगिंग, सायकल चालवणे, धावणे, शतपावले आदी प्रकारचा व्यायाम करता येणार आहे. मात्र, कोणत्याही ग्रुप अॅक्टिव्हिटीला परवानगी नसेल. खुल्या मैदानात गर्दीही करता येणार नाही. व्यायामाचं कोणतंही साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम वापरता येणार नाही.

बाजारपेठा, दुकाने (मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स वगळून) सम, विषम तारखेला कामाच्या वेळेत सुरू राहतील. एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं सुरु राहतील. नियमांचं काटेकोर पालन होण्यासाठी पोलिस आणि महापालिका आयुक्तांनी मार्केट तसंच दुकानं मालक असोसिएशनला चर्चेत सहभागी करुन घ्यावे. यावेळी वाहतूक व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन महत्त्वाचं असणार आहे.

कपड्याच्या दुकानात ट्रायल रूमला परवानगी नसेल. कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसेल. कारण त्यातून कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. शिवाय कोणत्याही प्रकारच्या कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी देण्यात आलेली नाही. 

याशिवाय प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ आदींना मास्क वापरून शारीरिक अंतर पाळून काम करण्यास मुभा देण्यात आली आहे. गॅरेज, वर्कशॉप देखील सुरू करता येणार आहेत.

खासगी कार्यालये दहा टक्के उपस्थितीत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार 8 जूनपासून खासगी कार्यालये 10 टक्के किंवा 10 कर्मचारी यापैकी जी संख्या अधिक त्या क्षमतेने सुरू करता येतील.

रविवारपासून म्हणजेच 7 जून 2020 पासून वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी स्वच्छतेच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. वृत्तपत्रांचे घरोघरी वितरण करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

शैक्षणिक संस्थांमध्ये (शाळा/कॉलेज/विद्यापीठ) शिकवण्याचे काम सोडून इतर कामे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात ऑनलाइन शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल जाहीर करण्यासाठीच्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावता येईल.
 

या गोष्टी बंदच असणार

मुंबईत काही प्रमाणात शिथिलता आणली असली तरी 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळे, स्पा, सलून, स्विमिंग पूल या गोष्टी बंदच राहतील. या दरम्यान रात्री 9 ते पहाटे 5 अशी संचारबंदीही कायम असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com