सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजली, पडदे उघडले |Dombivli | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवली : सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजली, पडदे उघडले

डोंबिवली : सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची तिसरी घंटा वाजली, पडदे उघडले

डोंबिवली : कोरोना काळात बंद असलेली नाट्यगृहे पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. राज्यातील पहिला प्रयोग सांस्कृतिक नगरीचा मान असलेल्या डोंबिवली शहरात पार पडला. शनिवारी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची तिसरी घंटा सायंकाळी 5 वाजता वाजली आणि नाट्यगृहाचा पडदा उघडताच नाट्य रसिकांनी एकच जल्लोष केला. अभिनेते प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाट्य प्रयोगाने नाटकांची नांदी झाली.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असताना नाट्यगृह, चित्रपट गृह कधी सुरू होतात याची रसिक वाट पहात होते. अखेर राज्य सरकारने 22 ऑक्टोबर पासून नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी दिली. राज्यात पहिल्या नाट्य प्रयोगाचा मान डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाला मिळाला. प्रयोगाच्या एक ते दिड तास आधीच रसिकांनी नाट्यगृहात जमण्यास सुरुवात केली होती. केवळ कल्याण डोंबिवलीतील नाही तर ठाणे, मुंबई येथून देखील प्रेक्षक डोंबिवलीत आले होते.

अभिनेते प्रशांत दामले, ज्येष्ठ दिग्दर्शक आनंद म्हसवेकर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, सचिव संजय जाधव, नाट्यगृह व्यवस्थापक दत्तात्रय लधवा यांसह अनेक नाट्य प्रेमी रसिक संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: कऱ्हाड : निवीदांच्या कामाकडे ठेकेदारांनी फिरवली पाठ

कोरोनाच्या लाटेनंतर आता नाटकांची लाट येऊन त्याला रसिकांचा प्रतिसाद लाभू दे असे गाऱ्हाणे यावेळी गायले गेले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त पवार यांनी नाटकाची घंटा वाजविली.

नाट्यक्षेत्र बंद असल्याने अनेक नवनवीन नाट्य कलाकार, दिग्दर्शक, लेखक हे सध्या मोठ्या प्रमाणात मालिकाकडे वळत आहेत. यामुळे रंगभूमीवर संक्रमण सुरू झाले असून या अवस्थेविषयी सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी चिंता व्यक्त केली. यासाठी राज्य सरकारने सोयी सुविधा द्याव्यात. या सुविधा कागदावर असल्याने नाट्यक्षेत्र पूर्वीप्रमाणे उभे राहण्यास त्यांचा नक्कीच फायदा होईल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनामुळे नाट्यक्षेत्राचे जे नुकसान झाले त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. मात्र नाट्यकर्मींनी शासनाकडे आर्थिक मदतीची कधीच मागणी केली नाही. त्याऐवजी राज्य शासनाने आम्हाला टप्प्याटप्प्याने सोयी - सुविधा वाढवून द्याव्या, तसेच 2022 पर्यंत राज्य शासनाने नाट्यगृहांच्या भाड्यात सूट देण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नाट्यक्षेत्रासाठी शासनाने या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास डिसेंबर 2023 पर्यंत नाट्यक्षेत्र पूर्वी जसे होते तसे उभे राहिल असा विश्वासही दामले यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Third Bell Dombivli Savitribai Phule Natyagriha Rang Curtains Opened

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top