esakal | मित्र नाही तू वैरी.., दारुच्या नशेत घेतला जीव!
sakal

बोलून बातमी शोधा

मित्र नाही तू वैरी.., दारुच्या नशेत घेतला जीव!

दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून अमोल सूर्यवंशी ऊर्फ विकी (28) याने मित्र राकेश गुप्ता (28) याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मित्र नाही तू वैरी.., दारुच्या नशेत घेतला जीव!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून अमोल सूर्यवंशी ऊर्फ विकी (28) याने मित्र राकेश गुप्ता (28) याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमोलने राकेशच्या मानेवर लोखंडाने हल्ला केला. या हल्ल्यात मानेचे हाड मोडल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एपीएमसी पोलिसांनी विकी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

ही बातमी वाचली का? दोन रिक्षांच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू

आरोपी अमोल सूर्यवंशी हा कामोठेत राहण्यास असून, तो एपीएमसीमध्ये वाहतूक व्यवसाय करतो; तर राकेश गुप्ता हा कोपरखैरणेत राहण्यास असून, तो एपीएमसीतील मार्केटमध्ये हमाल म्हणून काम करत होता. 6 फेब्रुवारीला काम संपल्यानंतर रात्री राकेश, विकी, जावेद व इतर मित्र बारमध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी राकेश आणि विकी या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याने विकीने राकेशला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी इतर मित्रांनी त्यांच्यातील भांडण सोडविले. मात्र, बारमधून बाहेर पडल्यानंतर पदपथावर पुन्हा त्यांच्यामध्ये वाद झाला. विकीने लोखंडी पान्याने पाठीमागून राकेशच्या मानेवर जोरदार फटका मारला. राकेशच्या मानेचे हाड तुटल्याने, त्याच्या उपचारासाठी 12 ते 13 लाख रुपये खर्च होणार असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? वैद्यकिय शिक्षणासाठी १० वर्षाची मर्यादा

राकेशच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, 13 फेब्रुवारीला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राकेशच्या आईने एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी अमोल सूर्यवंशी उर्फ विकी याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून शुक्रवारी (ता.14) रात्री घणसोली येथून त्याला अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.