वैद्यकीय शिक्षणासाठी 10 वर्षांची मर्यादा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निर्णय

मुंबई : वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी 10 वर्षांची मर्यादा घालण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला आहे. या निर्णयामुळे यापूर्वीची अमर्याद कालमर्यादा संपुष्टात येऊन विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यापासून 10 वर्षांत पदवीचे शिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. हा निर्णय 2019-20 या वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. वारंवार नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्याच वेळी समुपदेशन होणे गरजेचे असून यामुळे विद्यार्थ्याला करिअरचा योग्य मार्ग निवडता येईल, अशी भूमिका डॉक्‍टरांच्या मार्ड संघटनेने घेतली आहे.

मंत्र्यांच्या बैठकीआधी नवाब मलिक यांचं 'मोठं' वक्तव्य, म्हणालेत... 

भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या नियमानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही कालमर्यादा नव्हती. त्यामुळे साडेचार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी काही विद्यार्थ्यांना 12 हून अधिक वर्षे लागत असत. गेल्या वर्षी वैद्यकीय पदवीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे.

त्याने बिस्कीटच्या आमिषाने तिला घरात नेलं, आणि...

गतवर्षीच्या विद्यार्थ्यांना जुनाच नियम 
अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार विद्यार्थ्यांना आता अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. त्याप्रमाणे प्रवेश घेतल्यापासून 10 वर्षांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. पहिल्या वर्षांचा अभ्यासक्रम चार वर्षांत किंवा पुरवणी परीक्षेसह चार प्रयत्नांमध्ये पूर्ण करावा लागेल; तर पदवी घेण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी निश्‍चित केला आहे; मात्र गेल्या वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जुनाच नियम लागू होणार असल्याने त्यांना यातून दिलासा मिळाला आहे. 

तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; यंदाची महाशिवरात्र असणार विशेष...

वैद्यकीय अभ्यासक्रम अवघड असल्याने काही विद्यार्थ्यांना तो वेळेत पूर्ण करता येत नाही, परंतु काही महाविद्यालये उगीच विद्यार्थ्यांना नापास करतात. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना कालमर्यादेचे गांभीर्य येऊन ते अभ्यास करून वेळेत शिक्षण पूर्ण करतील. विद्यार्थी सतत नापास होत असल्यास त्यांनी करिअरच्या इतर पर्यायांचा विचार करावा. यासाठी त्याचे समुपदेशन केले पाहिजे. यातून अशा विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशाही मिळेल. 
- कल्याणी डोंगरे
, अध्यक्षा, मार्ड संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 year limit for medical education