
Mumbai News : मानपाडा पोलीस ठाण्यातील रीलने टिकटॉक स्टार तडीपार
डोंबिवली - आपली वेगळी ओळख बनविण्याच्या नादात व सोशल मिडीयावर लाईक्सचा भडीमार पडण्यासाठी वेगवेगळे व्हिडीओ बनविले जातात. काही व्यक्ती या आपल्याकडील सोन्याचे दागिने, शस्त्र यांच्यासह रिल बनवून भाईगिरी दाखवत प्रसिद्धी मिळवतात.
याच प्रसिद्धीच्या हव्यासापाई ठाकुर्ली येथील सुरेंद्र चौधरी याने पोलिसांच्या नकळत मानपाडा पोलिस ठाण्यात रिल बनविले. हे रिल बनविणे टिकटॉक स्टार चौधरीला महागात पडले आहे. तीन महिन्यातच त्याला मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून पोलिसांनी थेट तडीपारच करुन टाकले. सुरेंद्र याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पहाता 18 महिन्यांकरीता त्याला तडीपार करण्यात आले आहे.
ठाकुर्ली चोळेगाव परिसरात राहणारा सुरेंद्र पाटील उर्फ चौधरी हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याचे इंस्टाग्रामवर एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मिडीयावर रिल बनवून तो सातत्याने आपल्या फॉलोअर्सचे लक्ष वेधण्याचे काम करत असतो. मागील वर्षी जून महिन्यात 50 करोड पैशांचा पाऊस पाडतो सांगत 6 जणांनी त्याची फसवणूक केली होती.
यातील काही आरोपींना पकडून पोलिसांनी 19 लाख 96 हजाराची रक्कम जप्त केली होती. ही रक्कम घेण्यासाठी 25 ऑक्टोबरला सुरेंद्र हा मानपाडा पोलिस ठाण्यात आला होता. त्यावेळी त्याने मानपाडा पोलिस ठाण्यात ''रानी नहीं है तो क्या हुआ, बादशहा आज भी लाखो दिलों पे राज करता है'' या डायलॉग वर पोलिस कक्षातील अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसत एक रिल बनविला.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. कारण या व्हिडीओ विषयी पोलिसही अनभिज्ञ होते. पोलिसांनी त्याचे अकाऊटं चेक केले असता त्यावर शस्त्र हातात घेतलेले व्हिडीओ आढळून आले. सुरेंद्र याच्यावर गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. त्यावर सुरेंद्रने पोलिसांची माफी मागितल्याच्या व्हिडिओ व्हायरल केला होता.
मानपाडा पोलिसांनी सुरेंद्र याची कसून तपासणी केली आहे. सुरेंद्रने यापूर्वी पडघा व अंजूरफाटा आदि ठिकाणी मित्राच्या घरी पार्टी करताना हातात परवानाधारक पिस्तोल घेऊन त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. सुरेंद्र याच्यावर यापूर्वी मानपाडा, कोळसेवाडी व महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात 7 गुन्हे दाखल आहेत.
त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी व तो टिकटॉकच्या माध्यमातून समाज माध्यमावर प्रसिद्धीसाठी शस्त्राचा गैरवापर करत असल्याने त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव मानपाडा पोलिसांकडून पाठविण्यात आला होता.
हा प्रस्ताव वरिष्ठांनी मंजुर केला असून सुरेंद्र याला मानपाडा पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून बंदुक, 5 जिवंत काडतुसे आणि 55 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला 18 महिन्यांसाठी ठाणे, रायगड आणि मुंबई, मुंबई उपनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले असल्याची माहिती डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली.