Lockdown : पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागण्याची वेळ, भटक्या विमुक्त समाजाची व्यथा

walking on roads
walking on roads

मुंबई : मुंबईत वाघरी, माकडवाला, कंजारभाट, बंजारा, गोंधळी अशा अनेक भटक्या विमुक्त जमातींचे वास्तव्य आहे. या जमातींमधील प्रत्येकाचे हातावर पोट चालते. दोन महिन्यांपासून हाताला काम नसल्यामुळे दोन वेळच्या अन्नाची भ्रांत पडली आहे. त्यामुळे अनेकांनी गावाकडे पायपीट सुरू केली. मुंबईत थांबलेल्या अनेकांवर पोटाची खळगी भरण्यासाठी भीक मागण्याची वेळ आली आहे. 

भंगार गोळा करणे, मजुरी करणे, घरोघरी भांडी घासणे अशी कामे या समाजांतील व्यक्ती करतात. मुंबईत रोजगारासाठी आलेले हे लोक पदपथांवर, झोपड्यांत राहून जगतात. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाल्यावर रोजगार बंद पडला. गाठीशी असलेल्या किडुक-मिडुकावर कसेबसे काही दिवस काढले. नंतर उपासमारीची वेळ आल्यावर गावी परतण्याशिवाय पर्याय नव्हता. मुंबईत झोपड्याचे मालक भाड्यासाठी तगादा लावतात. म्हणून अनेकांनी चालत गाव गाठले.  बोरिवली, दहिसर भागात तेलंगणा राज्यातील बंजारा समाजाची मोठी वस्ती आहे. त्यांच्याकडे तेलंगणाचे रेशन कार्ड असल्याने मुंबईत अन्नधान्य मिळत नव्हते. सरकारकडून मदत मिळाली नाही. त्यामुळे अनेक जणांनी आधी वाशीपर्यंत पायपीट केली. तेथून मिळेल त्या वाहनाने पुढचा मुक्काम गाठत अखेरीस मूळ गावी पोहोचले, अशी माहिती भटके विमुक्त विकास परिषदेचे सहकार्यवाह नरेश पोटे यांनी दिली. 

वाघरी समाजातील लोक गल्लोगल्ली फिरून जुने कपडे घेऊन भांडी देतात. रस्त्यावर झोपडे बांधून राहणाऱ्या या लोकांची अवस्था अत्यंत वाईट झाली. सामाजिक संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीवर त्यांना दिवस काढावे लागत आहेत. भायखळा येथे कंजारभाट समाजातील 85 कुटुंबे झोपडपट्टीत राहतात. अन्नधान्याविना त्यांचे हाल होत आहेत. काही संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीवर त्यांचे जगणे सुरू आहे. अनेक कुटुंबे मूळ गावी परतली; मुंबईत राहिलेले रेशन दुकान किंवा किराणा दुकानाबाहेर भीक भागून दिवस काढत आहेत. या समाजांतील 60 टक्के लोकांकडे रेशनकार्ड नाही. बरीच कुटुंबे अन्य राज्यांतील आहेत. त्यांना सरकारच्या योजनांचा लाभ मिळत नाही. भटके विमुक्त विकास परिषदेने अशा गरजवंतांची यादी तयार करून मोफत अन्नधान्य दिले. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे, असे नरेश पोटे यांनी सांगितले. 

यवतमाळपर्यंत पायपीट
चारकोप पश्चिम येथे खाडीलगत बांधलेल्या झोपड्यांत दरमहा 700 ते 800 रुपये भाडे देऊन वडार समाजातील कुटुंबे राहतात. रोजगार गेल्यावर मुंबईत राहणे अशक्य झाल्याने 20 कुटुंबांनी पायी व सायकलवरून प्रवास करत यवतमाळ गाठले. शंकर चव्हाण व त्यांच्या कुटुंबीयांनी 700 किलोमीटरची पायपीट केली. वाटेत कधी एखाद्या वाहनात मुले आणि स्त्रियांना बसवून काही अंतर कापले. डोक्यावर रणरणते ऊन्ह, पाय पोळून निघायचे. भुकेने व्याकूळ झाल्यावर वाटेत कोणी तरी खायला दिले, तर चार घास पोटात ढकलून पुन्हा प्रवास सुरू करायचा... 

काम मिळत नसल्याने भटक्या-विमुक्त समाजातील लोकांचे खूप हाल होत आहेत. अनेकांकडे रेशनकार्ड नाही. सरकारने त्यांना इतर ओळखपत्रावर अन्नधान्य द्यावे. सामाजिक संस्थासुद्धा काही मर्यादेपर्यंतच मदत करू शकतात. म्हणून सरकारने अशा वंचित समाजाकडे लक्ष दिले पाहिजे. 
- नरेश पोटे, सहकार्यवाह, भटके विमुक्त विकास परिषद

time to beg to fill for stomach, the misery of a nomadic society

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com