टीएमटीचा प्रवास डिजिटल, बसची माहिती मिळणार एका क्‍लिकवर 

राजेश मोरे
सोमवार, 27 जानेवारी 2020

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा (टीएमटी) प्रवास आता डिजिटलकडे होऊ लागला आहे. गेल्या वर्षी टीकेचे लक्ष्य झालेला "व्हेअर इज माय टीएमटी बस' हे ऍप अखेर उत्तम प्रकारे कार्यरत झाल्याचा दावा टीएमटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. हे ऍप टीएमटीच्या बस थांब्यावर उभारण्यात आलेल्या एलईडी टीव्हीबरोबर जोडण्यात आलेले असल्याने बस थांब्यावरील प्रवाशांना त्यांची टीएमटी बस नक्की कोठे आहे, याची माहिती उपलब्ध होणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा (टीएमटी) प्रवास आता डिजिटलकडे होऊ लागला आहे. गेल्या वर्षी टीकेचे लक्ष्य झालेला "व्हेअर इज माय टीएमटी बस' हे ऍप अखेर उत्तम प्रकारे कार्यरत झाल्याचा दावा टीएमटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. हे ऍप टीएमटीच्या बस थांब्यावर उभारण्यात आलेल्या एलईडी टीव्हीबरोबर जोडण्यात आलेले असल्याने बस थांब्यावरील प्रवाशांना त्यांची टीएमटी बस नक्की कोठे आहे, याची माहिती उपलब्ध होणार आहे.

टीएमटीचा प्रवास डिजिटल कार्यप्रणालीकडे होताना पहिल्या टप्प्यात शहरातील प्रमुख 50 बसथांब्यांवर एलईडी स्क्रीन उभारण्यात आलेली आहे. टीएमटी प्रशासनाकडून आतापर्यंत 250 बसवर जीपीएस प्रणाली कार्यरत केली आहे. या बस सध्या वर्दळीच्या 98 बस मार्गावरून धावत आहेत. 

ठाणे परिवहनच्या ताफ्यात सध्या साडेतीनशे बस कार्यरत आहेत. मात्र त्यापैकी सुमारे 250 बस विविध मार्गावर कार्यरत आहेत. तर शंभर बस दुरुस्तीसाठी आगारात आहेत. कार्यरत असलेल्या 250 बसवर जीपीएस प्रणाली बसवण्यात आली आहे.

उल्हासनगरमध्ये लाखोंचा गुटखा जप्त

या प्रणालीमुळे कोणती बस कोणत्या मार्गावर आहे, वाहतूक कोंडीत अडकली आहे का?, शेवटच्या ठिकाणावर जाऊन किती वेळ थांबली आदी सर्वच माहिती परिवहनच्या अधिकाऱ्यांना "कमांड ऍण्ड कंट्रोल रुम'वर तत्काळ उपलब्ध होणार आहे. तसेच प्रत्येक बसने दिवसात किती फेऱ्या मारल्या याची माहिती मिळण्याबरोबर या बसच्या चालकांनी या दरम्यान काही फेऱ्या चुकविल्यास त्याची माहिती उपलब्ध होणार आहे. 

शरद पवार आमचे विठ्ठल ः संजय राऊत

ठाणे परिवहनचे सध्या 450 बस थांबे आहेत. त्यामधील 98 मार्गावरील 50 बसथांब्यांवर परिवहन प्रशासनाच्या माध्यमातून डिजिटल डिस्प्ले लावण्यात आले आहेत. याच बसथांब्यांवर एक क्‍युआर कोडही देण्यात आला आहे. यावर मोबाइलच्या माध्यमातून सर्च केल्यानंतर परिवहनचे ऍप प्रवाशांना मोबाइलमध्ये डाऊनलोड करता येणार आहे. त्यामुळे आपण ज्या बसथांब्यावर उभे आहोत, त्याठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या मर्गावरील बसची माहिती उपलब्ध होणार आहे. 

उशिर केल्यास कारवाई 
टीएमटीच्या बस थांब्यावर अनेक वेळ प्रवासी उभे राहिल्यानंतरही त्यांना बस मिळत नाही. तसेच बस नक्की कधी येणार याची माहिती उपलब्ध होत नाही. यावर मार्ग काढण्यासाठी "व्हेअर इज माय टीएमटी बस' हे ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे. यापूर्वी दोन वर्षापासून या ऍपवर सातत्याने टीका होत आहे. मात्र आता खऱ्या अर्थाने हे ऍप कार्यरत झाले आहे. हे ऍप डाऊनलोड केल्याने कुठली बस कुठे आहे, याची माहिती परिवहनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कार्यालयात मिळणार आहे. त्यामुळे कारण नसताना बसला उशीर केला गेल्यास संबंधित कर्मचाऱ्यावरही कारवाई केली जाणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TMT Travel Digital, bus information is clickable