esakal | बनावट लसीकरण रोखण्यासाठी व्हायल्ससंबंधी BMC ने घेतला महत्त्वाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

बनावट लसीकरण रोखण्यासाठी व्हायल्ससंबंधी BMC ने घेतला महत्त्वाचा निर्णय

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईत झालेल्या बनावट लसीकरणानंतर (fake vaccination) पालिकेने (BMC) आता अधिकची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत (Mumbai) फक्त बनावट लसीकरण न होता त्या कुप्यांचा पूर्नवापर ही केला गेला. त्यामुळे, आपल्या विभागातील सोसायटी आणि खासगी लसीकरण (private vaccination) केंद्रांच्या व्यवस्थापकांपर्यंत प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करत असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून अधिक दक्षता घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. (To stop fake vaccination now bmc make compulsary to registration of stickers on vials)

बनावट लसीकरणानंतर आता पालिकेने एक नवीन पाऊल उचलले आहे. त्याअंतर्गत खासगी लसीकरण केंद्र जर हाउसिंग सोसायट्यांमध्ये लसीकरणासाठी जात असतील तर त्यांनी संपूर्ण अहवाल योग्यरित्या ठेवून पालिकेला द्यायचा आहे. शिवाय, कुप्यांचा पुर्नवापर टाळावा म्हणून त्यावरील जो स्टिकर असेल तो काढून त्याची रजिस्टरमध्ये नोंद करुन चिकटून ठेवावे लागणार आहेत. त्यानंतर, त्या कुप्या वैद्यकीय पद्धतीने पूर्णपणे नष्ट करुन वैद्यकीय कचऱ्यात फेकण्याच्या सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: आता झिका व्हायरसचं टेन्शन, BMC अलर्ट मोडवर

शिवाय, खासगी लसीकरण केंद्रांना प्रत्येक कुप्यांचा अहवाल महापालिकेला द्यावा लागणार आहे. यासाठी प्रत्येक सोसायटीमध्ये वापरल्या जाणार्‍या लसीचे स्टिकर सुरक्षित ठेवावे लागतील जेणेकरुन लस कुठे दिली गेली याची माहिती पालिकेला सहज मिळू शकेल. मुंबईत बनावट लसीकरणाची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. हे रोखण्यासाठी पालिकेने नुकत्याच नवीन आणि अधिकच्या सूचना सर्व खासगी आणि पालिका लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत. बनावट लसीकरणाच्या तपासणीअंती एक गोष्ट समोर आली की, फसवणूक करणार्‍यांनी रिकाम्या लसीच्या कुप्यांमध्ये द्रव्य भरले होते.  हा गोंधळ पुन्हा होऊ नये म्हणून कुपीवर लावलेल्या स्टिकर आणि बॅच क्रमांकाची नोंद करावी लागणार आहे.

हेही वाचा: मुंबईच्या 'लॉकडाउन'संबंधी पालकमंत्र्यांचे सूचक विधान

महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, खासगी लसीकरण केंद्रांच्या व्यवस्थापकांना सोसायटीमध्ये वापरल्या जाणार्‍या प्रत्येक लसीच्या कुपीची संपूर्ण माहिती ठेवावी लागेल आणि मागणीनुसार ती पालिकेला द्यावी लागेल.  खासगी लसीकरण केंद्रांच्या मालकांना त्यांच्या नोंदणी पुस्तकात लसीकरणात वापरल्या जाणार्‍या प्रत्येक लसीचे स्टिकर चिकटवावे लागतील. याद्वारे हे समजण्यास सोपं होईल की कोणत्या बॅचमधील कुपी वापरली गेली आणि कधी वापरली गेली ?  या लसीचे डोस कोणाला दिले गेले? ही माहितीदेखील सहज उपलब्ध होईल जेणेकरुन तपासणी दरम्यान बनावट लसीकरण झाले आहे का? हे समोर येईल. दरम्यान, मुंबईत आता पर्यंत अशा 4 लाख 88 हजारांहून अधिक कुप्या वापरण्यात आल्या आहेत. त्यामुळे यातील कुप्या नियमानुसार नष्ट करण्यात आल्या का याचा आता शोध घेणे सुरु झाले आहे. महानगर पालिकेने याबाबत सर्व रुग्णालयांकडून माहिती मागवली आहे.

loading image