कल्याण रेल्वेस्थानक सुरक्षित स्थानक!
सिंधुताई सपकाळ यांनी सांगितलेल्या आठवणींना उजाळा
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ ः अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच निधन झाले. सिंधुताई यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांची विविध उपदेशपर संभाषणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक जणांनी सिंधुताईंचे फोटो आपल्या हॉट्सअप स्टेट्सला ठेवून त्यांना आदरांजली वाहिली. त्यातच सिंधुताई यांनी कल्याण स्टेशनमध्ये आलेला अनुभव सांगत असलेल्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘कल्याण रेल्वेस्थानकात भिक मागायचे, कारण ते स्थानक मोठे आणि सुरक्षित होते’, अशी भावना व्हिडीओत सिंधुताई बोलताना दिसून येत आहे. कल्याण स्टेशन विषयीचा अनुभव सिंधुताईंनी दोन वर्षांपूर्वी भिवंडी येथे आयोजित आगरी महोत्सवात सांगितला होता.
जानेवारी २०१९ मध्ये भिवंडी येथील सोनाली गावात आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आयोजकांनी समाजसेवक सिंधुताई सपकाळ यांना आमंत्रित केले होते. दरम्यान, त्यांनी यावेळी केलेल्या संभाषणात त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेले किस्से महिलांसमोर कथन केले. आपणही रेल्वेस्थानकात भिक मागून गुजराण केली असल्याचे त्यांनी सांगितले होते. कल्याण रेल्वेस्थानक हे मोठे स्थानक असल्याने तेथे सतत प्रवाशांची वर्दळ असायची. यामुळे हे स्थानक रात्रीही महिलांसाठी सुरक्षित वाटत होते. म्हणून येथेच भिक मागून रात्र ही कल्याण रेल्वेस्थानकात काढली असल्याची आठवण त्यांनी कथन केली होती. भिवंडी येथील कार्यक्रमाला येताना कल्याण स्थानकातून येताना त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्याचे त्या म्हणाल्या. गरिबी वाईट असते, गरीब वाईट नसतो, पुढे जा, पण मागे वळून पाहा, आज त्याची गरज असल्याचा मौलिक सल्ला यावेळी त्यांनी उपस्थितांना दिला होता.
सिंधुताईंना सोशल मीडियावर अभिवादन
आपले आयुष्य वंचित, अनाथ मुलांसाठी वेचणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अभिवादन करणाऱ्या पोस्ट नेटकऱ्यांनी लिहिल्या. अनेकांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेट्सला त्यांचे छायाचित्र ठेऊन त्यांना अभिवादन केले.