मेट्रो- ४ चे काम फास्ट ट्रॅकवर
पिलरवर गर्डर टाकण्यास सुरुवात; घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : वडाळा ते कासारवडवली मेट्रो- ४ ही २०२४ पर्यंत सुरू करण्याच्या दिशेने कामाला वेग आला आहे. त्याअनुषंगाने ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील कासारवडवली- गायमुखपर्यंतच्या ओवळा सिग्नल ते वेदांत हॉस्पिटल, घोडबंदर मार्गावर पिलरवर गर्डर टाकण्याचे काम मे. जे. कुमार इन्फाप्रोजेक्ट कंपनीमार्फत सुरू होणार आहे. या वेळी ठाण्याकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असून कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे.
गर्डर टाकण्याचे काम रात्रीच्या सत्रात होणार आहे. त्याची सुरुवात १० जानेवारीपासून झाली आहे. रात्री ११ ते पहाटे ५च्या दरम्यान काम करण्यात येईल. हे काम १५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या वेळेत पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका ग्रीन कॉरीडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वाहतूक बंदी लागू राहणार नाही, असे ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविले आहे.
---
प्रवेश बंद
- मुंबई-नाशिक महामार्गाच्या घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना तत्त्वज्ञान विद्यापीठ, कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद असणार आहे.
- मुंबईकडून कापूरबावडी जंक्शन, तत्त्वज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना माजीवाडा गोल्डन डाईज ब्रिजवर वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
- मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने ही कापूरबावडी सर्कल येथून उजवे वळण घेऊन बाळकुम नाका, भिवंडी आग्रा रोड, कशेळी, काल्हेर, अंजुर फाटा, भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच इतर हलकी वाहने ओवळा सिग्नल येथे डावीकडे वळण घेऊन विहंग सोसायटीसमोरून उजवीकडे वळण घेऊन घोडबंदर रोडमार्गे इच्छित स्थळी जातील.
- मुंबईहून कापूरबावडी जक्शन दिशेने येणारी जड-अवजड वाहने ही नाशिक रोडने खारेगाव टोलनाका, मानकोली नाका, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.