अंधश्रद्धेवर प्रहार करणाऱ्या ‘देवस्की’ला नेटकऱ्यांची पसंती
मुंबई, ता. १५ : २१ व्या शतकातदेखील बुवाबाजी, गंडेदोरे आणि अंधश्रद्धा समाजात फोफावली असल्याने जुन्या रूढी आणि अंधश्रद्धेवर जोरदार प्रहार करणाऱ्या लेखक व दिग्दर्शक अमोल उंबरकर यांच्या ‘देवस्की‘ फिल्मला नेटकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या फिल्ममध्ये दोन भावांची कथा असून हल्लीचे शिकलेले लोकसुद्धा अंधश्रद्धेच्या बाजारात येऊन कसे फसतात, याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या फिल्मने इंडियन शॉर्ट सिनेमा फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये हजेरी लावली आहे. तसेच या फिल्मचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी माहिती दिग्दर्शकांनी दिली आहे. ही फिल्म ए. एस. प्रॉडक्शन या बॅनरने निर्मित केली असून या फिल्ममध्ये अनिकेत शिंदे, राकेश संकपाळ, प्राप्ती परसराम, साक्षी पांडे, निकिता दीक्षित, रिया पांडे, सुनील पाईकराव आणि अपूर्वा बुचके हे कलाकार आहेत. देवस्कीची पटकथा संवाद आणि दिगदर्शन अमोल उंबरकर यांनी केले असून चित्रीकरण शुभम पाटील यांनी केले आहे. राकेश संकपाळ आणि अनिकेत शिंदे यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले तर संगीत देण्याचे काम अजय उंबरकर यांनी केले.
...
अडीच दिवसांत शूट
दिग्दर्शकाने ५० मिनिटांच्या या फिल्मचे चित्रीकरण केवळ अडीच दिवसांत (३२ तासांत) शूट करून एक रेकॉर्ड बनवला आहे. यापूर्वी अमोलने केलेल्या व्हायरस, चूक, नवदुर्गा आणि परंपरा या शॉर्ट फिल्मना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या फिल्मचे संपूर्ण चित्रीकरण जुन्नर भागातील पारुंडे या गावात झाले आहे.
...