

‘एल्फिन्स्टन’ पाडकामाने कोंडी वाढणार
निर्धारित वेळेत पूल बांधणीचे आव्हान; दोन वर्षे राहणार बंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबईतील ब्रिटिशकालीन जुन्या पुलांपैकी एक एल्फिन्स्टन पूल लवकरच पाडला जाणार आहे. नव्याने उभारण्यासाठी हा पूल दोन वर्षांसाठी बंद करावा लागणार असून, त्यासाठी वाहतूक मार्गात मोठे बदल करून पर्यायी मार्ग सूचवण्यात आले आहेत. हा पूल बंद झाल्यास परळ, लालबाग, प्रभादेवी या परिसरात वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे.
परळ आणि प्रभादेवी परिसरास पूर्व-पश्चिमेस जोडणारा एल्फिन्स्टन पूल हा मुंबईतील अत्यंत व्यस्त असणाऱ्या पुलांपैकी एक आहे. हा पूल पाडून त्या जागेवर नवा पूल बांधण्यात येणार आहे. मात्र यासाठी साधारणत: दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. यादरम्यान वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहेत. वाहतूक व्यवस्थापनाबाबत अधिसूचनेचा मसुदा मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने तयार केला आहे. त्या बदलाच्या संदर्भात वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या काही हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.
एल्फिन्स्टन पूल हा मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत तोडून नवीन उड्डाणपूल आणि शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाचे काम करण्यात येणार आहे. एल्फिन्स्टन पुलामार्गे जाणारी वाहतूक नजीकच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात बंद करून या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांनी वळवून वाहतूक व्यवस्थापन केले जाणार आहे.
दादर, परळ, वरळी, प्रभादेवी या परिसराकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर केला जातो. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी या पुलावर नेहमी वाहतूक कोंडी असते. सिग्नलसाठीदेखील १५ ते २० मिनिटे प्रतीक्षा करावी लागते. हा पूल तोडल्यानंतर या भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.
मुंबईत सायन, कर्णाक पूल, गोखले पूल यासारखे अनेक महत्त्वाचे पूल जीर्ण झाल्यामुळे पाडले. मात्र नव्या पूल बांधणीची डेडलाइन पुढे गेल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागले आहेत. अंधेरीच्या गोखले पुलाची डेडलाइन वाढल्यामुळे अंधेरीसह पश्चिम मुंबईत वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती.
रुग्णांना फटका
परळमध्ये केईएम, टाटा आणि वाडिया ही तीन मोठी रुग्णालये असल्यामुळे येथे उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक यांची संख्या दिवसाला हजाराेंच्या संख्येत असते. त्याचवेळी आपत्कालीन रुग्ण आणि रुग्णवाहिकांना करी रोड किंवा टिळक पुलावरून येताना बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे रुग्णांना त्रास होण्याची दाट शक्यता असल्याचे स्थानिक नागरिक अरुण गमरे यांनी सांगितले.
मुळात पर्यायी मार्ग असलेला करी रोडचा पूल छोटा आहे. एवढी वाहतूक झेलण्याची क्षमता पुलाची नाही. आताच तिथे वाहतूक कोंडीची परिस्थिती आहे. करी रोडवरून गणपती नेण्यासही अनेक बंधने आहेत. पुलाला धोका असल्याचे आम्हाला सागंण्यात आले होते.
- सचिन शेट्टी, समाजसेवक
सायन पूल पाडला, मात्र अजून बांधकाम सुरू झाले नाही. नवे पूल बांधणे ही भविष्याची गरज आहे. मात्र वेळेत पुलाचे बाधकाम पूर्ण करावे व पर्यायी वाहतुकीची सक्षम व्यवस्था करावी.
- नारायण आंगणे, समाजसेवक
यावर नोंदवा प्रतिक्रिया
अंतिम मसुदा तयार करण्यासाठी नागरिकांच्या हरकती मागवण्यात आल्या असून, नागरिकांना त्या addlcp.traffic@mahapolice.gov.in या ई-मेल आयडीवर दिनांक १३/०४/२०२५ रोजी पूर्वी पाठवाव्या लागणार आहेत.
असा बसणार फटका....
१. एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यास आजूबाजूच्या परिसरात वाहतूक कोंडी दुपटीने वाढणार
२. तुळशी पाइप रोड, दादर पश्चिम (फुल मार्केट परिसर) प्रभादेवी, सेंच्युरी बझार, अगर बाजार, वरळी कोडीवाडा येथील नागरिकांना परळला यायचे असेल किंवा येथून परतायचे असेल तर एल्फिन्स्टन पुलावरून यावे लागते. आता त्यांना करी रोड किंवा दादरच्या टिळक पुलाचा वापर करावा लागेल.
३. करी रोड आणि टिळक पूल या पर्यायांचा वापर केला तरी मोठा वळसा घाऊन परळला यावे लागणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यास अधिक हाल होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.