

पालघर, ता. २२ (बातमीदार) : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात आज (ता. २२) एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, असे जिल्हा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पहिला दिवस उमेदवारी अर्जाविनाच गेल्याचे दिसून आले.
पालघर विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी मंगळवारपासून सुरुवात झाली, मात्र काही पक्षांचा उमेदवार अजून निश्चित झाला नसल्याने त्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही. विधानसभा निवडणुकीसाठी २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करायचे आहेत. त्यामध्ये शनिवार आणि रविवार सुटी वजा जाता उमेदवारी अर्ज सादर करण्यास सहा दिवस शिल्लक आहेत. पालघरमध्ये आज पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज सादर केला नाही.
विधानसभेच्या निवडणुकांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. महायुतीतर्फे शिंदे गट शिवसेना, तर महाविकास आघाडीतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीने निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याचे घोषित केले आहे, मात्र बविआने तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. अन्य जागांवरील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले. अन्य पक्षांकडून अद्याप उमेदवारांची नावे घोषित करण्यात न आल्याने मतदार संभ्रमात आहेत.
पाच नावे घोषित
बोईसर मतदारसंघामधून राजेश पाटील, नालासोपारा क्षितिज ठाकूर आणि वसईमधून हितेंद्र ठाकूर यांना उमेदवारी बहुजन विकास आघाडीकडून जाहीर झाली आहे. कम्युनिस्ट पक्षातर्फे डहाणू मतदारसंघासाठी विनोद निकोले, विक्रमगड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुनील भुसारा यांची नावे घोषित आहे. अजून भाजप व शिंदे शिवसेना गट, तसेच उद्धव ठाकरे गटाने उमेदवारांची नावे अजूनही घोषित केलेली नाहीत. या पक्षांच्या उमेदवारांकडे मतदारांचे लक्ष आहे.
पुन्हा उमेदवारीची शक्यता
शिंदे शिवसेना गटातून विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे, मात्र खासदार श्रीकांत शिंदे पालघरमध्ये बैठक आयोजित केली होती, त्या वेळी शिवसैनिकांनी त्यांच्या उमेदवारीला नाराजी व्यक्त केली होती व दुसऱ्या उमेदवाराची मागणी केली होती, मात्र वनगा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीला गुजरातमध्ये गेले होते. त्या वेळी त्यांना आश्वासन दिले होते, जे आमदार माझ्यासोबतीला होते, त्यांना पुन्हा आमदारकीसाठी उमेदवारी दिली जाईल, असे आश्वासन दिल्यामुळे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे त्यांचेच नाव पुढे येईल, अशी चर्चा आहे.
दोन दिवसांत निर्णय
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष, विद्यमान सदस्य वैदेही वाढाण याही उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांनी आपला प्रचारही सुरू केला आहे. त्यांचेही नाव आघाडीवर होते, नंतर मात्र मागे पडलेले दिसते. माजी खासदार राजेंद्र गावित हे भाजपमधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी दिली जाणार, अशीही चर्चा असून त्यात जोडीला नुकताच बहुजन विकास आघाडीतून शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांनीही पालघर विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी दर्शवली आहे. यापैकी कोणाची वर्णी लागते, हे एक-दोन दिवसांत कळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.