Harshwardhan Sapkal
ESakal
Maharashtra Politics: काँग्रेसचा ‘एकला चलो’चा नारा! आगामी निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे धोरण
मुंबई : लोकसभा, विधानसभेत अभेद्य ठरलेली महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दुंभगण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकांच्या माध्यमातून नवे नेतृत्व घडवण्याची संधी या वेळी दवडायची नाही, या निष्कर्षावर पक्षनेतृत्व आले आहे. त्यामुळे आगामी पालिका, झेडपी निवडणुका स्वतंत्र लढवण्याचा कल पक्षनेतृत्वात दिसून येत आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये झालेल्या फाटाफुटीनंतरही लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अभूतपूर्व यश मिळवले; मात्र काही महिन्यांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे यश टिकवण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली. विधानसभा निकालामध्ये विरोधी पक्ष ५० जागांवर संपुष्टात आला. या अपयशानंतर महाविकास आघाडी एकसंध राहणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. वर्षाअखेर होत असलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही शंका खरी होताना दिसणार असल्याचे चित्र आहे.
आघाडीच्या राजकारणामुळे पक्षाला नवे नेतृत्व विकसित करण्याला मर्यादा येतात, असे पक्षनेतृत्वाचे म्हणणे आहे. पक्ष संघटना पुनरुज्जीवित करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे आहे. हे नवे चेहरे स्थानिक राजकारणात रुजवण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपालिकांच्या निवडणुका ही एक मोठी संधी असते. या वेळी ही संधी गमवायची नाही, असे प्रदेश काँग्रेसने ठरवले आहे. या मोहिमेंतर्गत ३५७ पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी स्थापन केली असून, काम करण्याची क्षमता व निष्ठा असलेल्या पदाधिकाऱ्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. सध्या जिल्हावार बैठकांचे सत्र सुरू आहे.
फोडाफोडीचे गणित
महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवून यश मिळाले तरी अध्यक्ष आणि सभापती निवडीवेळी फोडाफोडीचे राजकारण तसेही होणारच आहे. सत्तास्थापनेच्या संघर्षात मित्रपक्षांतही स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. निवडणुका पार पडल्यानंतर मित्रपक्षांसोबत जाण्याचा मार्ग तसाही मोकळा असणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष संघटनेत आलेली मरगळ यानिमित्ताने झटकता येईल व पक्षाला स्वतंत्र अस्तित्व व राजकीय ताकद निर्माण करता येईल याची खात्री पक्षनेतृत्वाला आहे.
‘स्थानिक’च्या निवडणुका हे आमचे अंतिम लक्ष्य नाही. आमचा भर पक्ष अधिक मजबूत करण्यावर आहे. त्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील.
- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

