भल्यामोठ्या होर्डिंग्जची तपासणी

भल्यामोठ्या होर्डिंग्जची तपासणी
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : महापालिका क्षेत्रात प्रशासनाने जाहिरात कंपन्यांना लागू केलेले नियम डावलून परवानगीपेक्षा जास्त आकारमानाचे होर्डिंग उभारण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ठाणे पालिकेच्या जाहिरात विभागाकडून केवळ ६०५ होर्डिंगला अधिकृत परवानगी देण्यात आली असताना, प्रत्यक्षात दीड हजारहून अधिक होर्डिंग उभारण्यात आली आहेत. त्यानंतर आता अनधिकृत होर्डिंगसह मंजुरीपेक्षा जास्त आकारमान असलेल्या होर्डिंगची तपासणी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन राठोड यांनी जाहिरात विभागाला दिले आहेत. तसेच त्याचा अहवाल सादर करून पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे.

ठाणे महापालिका हद्दीत आज शहराच्या विविध भागांत भले मोठे होर्डिंग उभारण्यात आले आहेत. दरम्यान, ठरवून दिलेल्या आकारामानापेक्षा अधिक आकारमानाचे होर्डिंग लावले जात असल्याचा मुद्दा मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे. ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ही बाबदेखील उघडकीस आणली होती. त्यानंतर पालिकेने अशा होर्डिंगवर कारवाईदेखील केली. असे असले तरीदेखील अद्याप हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघालेला नाही. होर्डिंगसंदर्भात असलेल्या २०२२च्या जीआरनुसार तसेच वाहतूक विभागाच्या नियमानुसार होर्डिंगचा आकार आणि ते कसे असावेत, याचे नियम आहेत. मात्र या नियमांची मोठ्या होर्डिंग कंपन्यांकडून सर्रास उल्लंघन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नियमांना बगल
नियमानुसार होर्डिंगच्या आकारासाठी कमाल ३० बाय ३० फूट अशी मर्यादा आहे. शहरातील अनेक होर्डिंग या निकषापेक्षा मोठ्या आकाराचे असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने प्रत्येक होर्डिंगची लांबी, रुंदी, उंची आणि प्रत्यक्ष परवानगी यांची तपासणी करावी आणि त्यावर कारवाई करण्याची मागणी चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. वाढीव अनधिकृत होर्डिंगमुळे पालिकेचे उत्पन्नदेखील बुडत असून, हे उत्पन्न संबंधित जाहिरातदारांकडून वसूल करण्यात यावे, अशी मागणीदेखील दक्ष नागरिकांनी केली.

अधिकाऱ्यांकडून कबुली
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन राठोड यांनी जाहिरात विभागाची एक बैठक नुकतीच घेतली होती. त्यानुसार अशा प्रकारचे होर्डिंग शहरात आहेत का, असा सवाल केला असता, तसे प्रकार जाहिरातदारांकडून झाल्याची एक प्रकारची कबुलीच विभागातील अधिकाऱ्यांनी दिली होती.

अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश
आता असे किती होर्डिंग आहेत ज्यावर कशा पद्धतीने कारवाई केली जाणार, त्यांच्याकडून पालिकेचे झालेले नुकसान कसे वसूल करणार, याबाबतचा सविस्तर अहवाल राठोड यांनी मागविला आहे. हा अहवाल आल्यानंतर संबंधित जाहिरातदारांच्या वाढीव अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com