महामुंबई लॉकडाऊनच्या दिशेने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

कंपन्या, आस्थापनांना 50 टक्केच कर्मचारी बोलावण्याचे आयुक्तांचे निर्देश

मुंबई : मुंबई लॉकडाऊनच्या पहिल्या पायरीवर पोहचली आहे. मॉल्स, थिएटर, नाट्यगृह आणि शाळा बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता आपत्कालीन सेवा वगळता सर्व कंपन्या, आस्थापनांनी 50 टक्केच कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्याचे निर्देश आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर डी- मार्ट बाबत महत्त्वाची बातमी

सध्या महामुंबईतील कोरोना विषाणूची बाधा वाढत असल्याने हा आजार साथीचे स्वरूप घेऊ नये म्हणून कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी कोरोनाबाबत आढावा घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिकेतही संध्याकाळी उशिरा बैठक झाली. या बैठकीनंतर आयुक्त परदेशी यांनी परिपत्रक प्रसिद्ध करून हे निर्देश दिले. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकारी सहायक आयुक्त आणि उपायुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच समुद्रकिनारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याचीही खबरदारी घेण्याचेही निर्देश दिले. 

रुळ वाकल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा विस्कळित

निम्मे व्यवहार थंडावणार! 
या निर्णयाचे पालन न करणाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत कोरोनाच्या उपचारांसाठी कस्तुरबा आणि मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आले आहेत. या परिसरातील रहदारी ही नियंत्रित करावी, असे निर्देशही देण्यात आले. चीनमध्ये कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी वुहान शहरातील सर्व व्यवहार बंद केले होते. वुहान प्रांत गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर आता मुंबईतील निम्मे व्यवहार बंद होण्याची शक्‍यता आहे. 

यांना वगळले 
पाणीपुरवठा, मलनिःसारण, रुग्णालय, औषधाची दुकाने, बॅंका, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा, भाजीपाला आणि धान्यांची दुकाने, सार्वजनिक परिवहन

Towards the Greater Mumbai Lockdown


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Towards the Greater Mumbai Lockdown