खेळणी व्यापाऱ्यांचे मंगळवारी आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

आयात कर ६० टक्के केल्याचा निषेध

 मुंबई ः खेळण्यांवरील आयात कर २० टक्‍क्‍यांवरून ६० टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ खेळणी व्यापारी १८ फेब्रुवारीला महात्मा जोतिबा फुले मंडई येथे दुकाने बंद करून आंदोलन करणार आहेत. मुंबई युनायटेड टॉईज असोसिएशनच्या गुरुवारी (ता. १३) झालेल्या बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला.

मोठी बातमी नवी मुंबई काबीज करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी, वाचा...

या बैठकीत मुंबईतील ६० खेळणी व्यापारी सहभागी झाले होते. या वेळी मुंबई युनायटेड टॉईज असोसिएशनचे अध्यक्ष फारूक शाबदी, प्रतिनिधी अब्दुल शरिफ, गुलशन हसिजा व अन्य उपस्थित होते. खेळण्यांवरील आयात कर वाढवल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होणार असून, खेळण्यांच्या किमतीत ५० टक्के वाढ होण्याची शक्‍यता आहे. किमती वाढल्यास खेळणी विकत घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जाईल. छोट्या व्यापाऱ्यांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकेल, असे अब्दुल शरिफ यांनी सांगितले.

महत्वाची बातमी अशोक चव्हाण म्हणतात बाळासाहेब थोरातांना हटवा, सोनिया गांधीकडे तक्रार?   

‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत भारतीय खेळण्यांचे उत्पादन वाढावे म्हणून आयात कर वाढवण्यात आला; परंतु भारतात केवळ १५ ते २० टक्के खेळणी बनवली जातात आणि ८५ टक्के खेळणी आयात केली जातात. देशातील खेळणी उद्योगाची क्षमता कमी आहे. आयात करातील वाढीमुळे खेळण्यांच्या किमती वाढल्यावर विक्रीला फटका बसेल. ही तूट भरून काढणे व्यापाऱ्यांना अशक्‍य होईल, असे गुलशन हसिजा म्हणाले.
परदेशांत खेळणी उद्योगांत अधिक कल्पकता आहे. त्यामुळे आपण खेळणी आयात करतो. भारतात खेळणी बनवण्याचे तंत्रज्ञान अजून म्हणावे तितके विकसित नाही. त्यासाठी सरकारने मदत केली, तर भारतातील खेळणी उद्योगाची भरभराट होईल, असे मत अब्दुल शरिफ यांनी व्यक्त केले.

 

व्यापारी म्हणतात...
- खेळण्यांच्या किमती दुप्पट होण्याची शक्‍यता
- छोटे व्यवसाय बंद होण्याची भीती
- देशातील खेळणी तंत्रज्ञान अविकसित

Toys traders protest on Tuesday


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toys traders protest on Tuesday